|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रकल्पाचा एक रुपयाचाही भुर्दंड न.पं.वर नाही!

प्रकल्पाचा एक रुपयाचाही भुर्दंड न.पं.वर नाही! 

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती : एक टक्का सीएसआर फंड न. पं. ला मिळणार! : ए. जी. डॉटर्सचा कचरा प्रकल्प : विरोधकांसह नागरिकांनी केव्हाही चर्चेला यावे!

वार्ताहर / कणकवली:

कणकवली न. पं.च्या गार्बेज डेपोमध्ये ए. जी. डॉटर्समार्फत करण्यात येणारा कचरा प्रकल्प हा न. पं.वर कोणताही बोजा लादणारा असणार नाही. या प्रकल्पाच्या करारावर मुख्याधिकाऱयांसह मी व बांधकाम सभापतींनी सहय़ा केल्या आहेत. न. पं.ला तोटय़ात घालणारा प्रकल्प आम्ही करीत नसून ए. जी डॉटर्सला होणाऱया एकूण फायद्याच्या एक टक्का सीएसआर फंड कंपनी न.पं.ला देणार आहे. या प्रकल्पाबाबत विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केलेले प्रश्न हे निराधार असून विरोधकांशी या प्रकल्पाबाबत आम्ही सत्ताधारी म्हणून केव्हाही खुली चर्चा करण्यास तयार आहोत, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नलावडे बोलत होते. मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, रवींद्र गायकवाड, बांधकाम सभापती अभिजीत मुसळे, आरोग्य सभापती ऍड. विराज भोसले, गटनेते संजय कामतेकर आदी उपस्थित होते.

नलावडे म्हणाले, राज्यात 900 कोटींची गुंतवणूक असलेला कचरा प्रकल्प प्रथमच कणकवलीत होतोय. प्रकल्पाचा एक रुपयाचाही भुर्दंड न. पं.वर पडणार नाही. कचरा प्रकल्पाबाबत विरोधी नगरसेवक तसेच नागरिकही चर्चेला येऊ शकतात. 175 मेट्रीक टन कचरा संकलन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही. फक्त कणकवली नगरपंचायत हद्दीत रोज जमा होणारा पाच टन कचरा आम्ही ए. जी. डॉटर्स कंपनीला देणार आहोत. कचरा संकलन आणि त्यावरील प्रक्रिया करण्याची सर्व जबाबदारी कंपनीची आहे. या प्रकल्पासाठी नगरपंचायतीकडील 3 एकर जागा भाडे तत्वावर एजी डॉटर्स कंपनीला देण्यात आली आहे. वर्षाला 3 लाख 57 हजार भाडे आणि न परतावा डिपॉझिट साडेसहा लाख रुपये असा करार आम्ही केला आहे.

शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी या प्रकल्पाबाबत केलेल्या अभ्यासाचे स्वागत करायला हवे. मात्र, करार इंग्रजीत असल्याने त्यांची काही शब्दांची गल्लत झाली आहे. नाईक यांच्या आक्षेपाला आम्ही सभागृहातच उत्तरे दिली होती. तरीही अजून शंकांचे निरसन करण्यास आम्ही तसेच कंपनीही तयार आहे. 25 वर्षांच्या करारावर जागा भाडेतत्वावर देण्यात आली, तरी प्रकल्पाच्या वाटचालीचा विचार करून न. पं. निर्णय घेऊ शकते. कंपनीला होणाऱया फायद्यातून एक टक्का सीएसआर न.पं.ला व उर्वरित 1 टक्का सीएसआर इतर ग्रा.पं. व नगरपालिकांना देण्यात येणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

ए. जी. डॉटर्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय गिरोत्रा यांनी नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खुलासा केला आहे. त्यानुसार प्रकल्पाचा सर्व खर्च ए. जी. डॉटर्स करणार आहे. कंपनी स्वखर्चातून कलेक्शन पॉईंटवरून कचरा कलेक्शन करणार आहे. या कलेक्शन पॉईंटचे सुशोभिकरण ए. जी. डॉटर्सकडून करण्यात येणार आहे. वाणिज्य उत्पादन मिळण्यापूर्वीच सर्व खर्च कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याचे गिरोत्रा यांनी स्पष्ट केल्याचे नलावडे यांनी सांगितले.

नाईकांप्रमाणे बाकीच्यांना जमले नाही!

आम्ही नगरपंचायतीची सत्ता घेतल्यानंतर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळालेली नाही. आम्ही चुकीचे काम केले, तर विरोधकांनी ते हक्काने विचारायला हवे. ते काम सुशांत नाईक यांनी केले. मात्र, बाकीच्या विरोधी नगरसेवकांना ते जमले नाही. नाईक यांनी शहराच्या हितासाठी असेच दक्ष राहवे. आम्ही पारदर्शक कारभार नक्कीच दाखवून देऊ. विरोधकांनी केलेल्या न. पं.च्या साहित्य खरेदी व आमच्या काळातील खरेदीच्या दरात जनतेला निश्चितच फरक दिसेल, असा टोला नलावडेंनी लगावला.