|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कॉंग्रेस जनसंघर्ष यात्रेचे सोपस्कार पूर्ण

कॉंग्रेस जनसंघर्ष यात्रेचे सोपस्कार पूर्ण 

खासदार, आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधीलही पाटी जवळजवळ कोरीच असलेल्या कोकण प्रांतात कॉंग्रेस नेत्यांची जनसंघर्ष यात्रा सुरू झाली आहे. राज्याचा नकाशा डोळय़ासमोर ठेवल्यानंतर ज्या प्रांतावर नेहमीच प्रदेशकडून फुली मारली जाते व पक्षीय राजकारणात नेहमीच ‘वजाबाकी’त असलेल्या कोकणात सुरू असलेली कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा म्हणजे निव्वळ सोपस्कार आहे. यातून काय हाती लागणार याची पूर्ण कल्पना प्रदेशबरोबर स्थानिक नेत्यांनाही आहे.

 

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या शेवटच्या कोकणातील टप्प्याला सिंधुदुर्गातून प्रारंभ झाला. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह ठरावीकच नेते वगळता   उर्वरितांनी पाठच फिरवली. या यात्रेत पाच वर्षांच्या मोदी तसेच फडणवीस सरकारने जनतेची फसवणूक केली असून या लोकांना पुन्हा थारा देऊ नका असे आवाहन काँग्रेसचे नेते करत आहेत. मात्र, गत निवडणुकीतील दारूण पराभवानांतर यातील किती नेतेमंडळी गेल्या पाच वर्षात कार्यकर्ते आणि जनतेसमोर आली हा प्रेन महत्त्वाचा आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाच्या प्रचंड पडझडीच्या काळात कोकणात विशेषतः रत्नागिरीत काँग्रेसने खूपच दुर्लक्ष केले.   अनेक महिने पक्षाला जिल्हाध्यक्षही देता आला नाही यामागील कारणांचा शोध यानिमित्ताने या नेत्यांनी घेणे गरजेचे आहे.

लोकसभा निवडणूक काही महिन्यावर आलेली असताना सुरू असलेली ही संघर्षयात्रा आणि त्यातील भाषणबाजी कोकणी जनता पुरती ओळखून आहे. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नारायण राणेंच्या घरवापसींवर केलेल्या विधानावर तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेसचे अस्तित्व शोधायची वेळ आणणाऱया राणेंवर टीका करण्याचे मात्र काँग्रेस नेते टाळत असल्याने ‘दाल मे कुछ काला है’  म्हणण्यास वाव आहे. 

या यात्रेचा राजकीय हेतू तुर्तास बाजूला ठेवला तरी प्रदेश नेत्यांच्या आगमनाने मरगळलेला कार्यकर्ता मात्र थोडाफार सुखावलेला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये गाव पातळीपर्यंत कांग्रेसची निशाणी पोहचवण्यात अपयश आलेले कार्यकर्ते काही प्रमाणात तरी पुन्हा चार्ज झाले आहेत. या यात्रेच्या निमित्ताने आगामी निवडणुकांच्यादृष्टीने कार्यकर्ता निश्चितच उत्साहाने पेटून उठेल यात मात्र शंका नाही. मात्र या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेल्या उत्साहाला अधिक खतपाणी घालून पुन्हा काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केले तरच या यात्रेचा खरा उद्देश सफल होऊ शकेल.

एकेकाळी मजबूत संघटन असलेल्या कोकण भूमीत कॉंग्रेस जोमात होती. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर कांग्रेसची मोठी हानी झाली. नारायण राणे यांच्यामुळे काही वर्षे कांग्रेस पुन्हा जोमात आली होती. मात्र राणेंनी साथ सोडल्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातील तीनही जिल्हय़ात काँगेसची स्थिती अतिशय बिकट झालेली आहे. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही  प्रामाणिक तळमळ आहे. मात्र पक्ष म्हणून ना पाठबळ आणि कुठला कार्यक्रम, त्यामुळे कार्यकर्त्याची ‘हाता’ची घडी अजूनही सुटलेली नाही.

भाजप-शिवसेना सत्तेत येण्यापूर्वी दीर्घकाळ कॉंग्रेस सत्तेत होती. मात्र तरीही कोकणात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न झाले नाहीत. यातच कांग्रेसमधील जुनी ‘खोडी’ जागा अडवून बसल्याने नवीन पिढी फारशी आकर्षितच झाली नाही. त्यामुळे नवे नेतृत्व पुढे येताना दिसत नाही.

कांग्रेसने रत्नागिरी जिल्हय़ाचे सुपुत्र हुसेन दलवाईना राज्यसभा, तर हुस्नबानू खलिपे याना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व दिले असले तरी कॉंग्रेस वाढीत राजापूर वगळता काहीच पदरात पडलेले नाही. जिल्हा परिषदेत 55 जागांमध्ये केवळ एक तर पंचायत समितीच्या 110 जागांपैकी 5 एवढेच सदस्य कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. यामध्येही पक्षापेक्षा उमेदवारांचे कर्तृत्व अधिक आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाटय़ाला आला आहे. मात्र या मतदारसंघातील अवस्था पाहता येथून कॉंग्रेसकडून कोणताही नेता निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. परिणामी ही जागा लढवण्यास कॉंग्रेसने राष्ट्रवादीकडेच गळ घातली. त्यानुसार राष्ट्रवादीकडून नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यानी सिंधुदुर्ग दौऱयात राणेंची भेटही घेतली. मात्र परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने चिपळूणात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यानी हा मतदारसंघ कॉंग्रेसचाच असल्याने त्यानीच तो निर्णय घ्यावा असे सांगून या विषयला पूर्णविराम दिला.

राजेंद शिंदे