|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आणखी 6 भाविकांचे मृतदेह सापडले

आणखी 6 भाविकांचे मृतदेह सापडले 

कारवार समुदातील दुर्घटना, मृतांची संख्या 14

प्रतिनिधी/ कारवार

अरबी समुद्रातील कूर्मगड बेटावरील श्री नृसिंह मंदिराची यात्रा आटोपून येणाऱया भाविकांची होडी उलटून बेपत्ता झालेल्या 8 पैकी 6 जणांचे मृतदेह मंगळवारी आढळून आले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 झाली आहे. सोमवारी दुपारी देवबाग बोटिंग सेंटरच्या मालकीची होडी काळी नदी आणि अरबी समुद्र संगमावर उलटून आठ जणांचा मृत्यू झाला होता. 19 जणांना वाचविण्यात आले होते तर आठ जण बेपत्ता झाले होते. होडीतून एकूण 35 भाविक प्रवास करीत होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. मंगळवारी सहा मृतदेह आढळून आले  असून  मयतांची नावे किरण (वय 4) परशुराम (वय 35), श्रेयस पावसकर (वय 28), संजीवनी (वय 14), सौजन्या (वय 12),  अशी आहेत.

यापैकी किरणचा मृतदेह देवगड (लाईट हाऊस) जवळ, परशुराम यांचा मृतदेह अळवेवाडा-कोडीबाग, श्रेयस पावसकरचा मृतदेह देवबाग, संजीवनीचा मृतदेह कूर्मगड, सौजन्याचा मृतदेहही कूमर्गडजवळ आणि गीता हुलसवारचा (वय 23) मृतदेह कोस्टगार्डच्या शोधमोहिमेच्या पथकाला आढळून आला.

रात्री मृतदेहाचा शोध लावण्यात अपयश

भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाद्वारे रात्री प्रकाशझोतात बेपत्ता झालेल्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे रात्री उशिरा शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी भारतीय नाविक दलाच्या हेलिकॉप्टरचा, डोनीयर एअरक्राफ्टचा, भारतीय तटरक्षक दलाच्या सी 155, सी 420, सी 123 जहाजांची आणि भारतीय तटरक्षक दलाच्या बृहत आकाराच्या अमर्त्य जहाजाची मदत घेण्यात आली. त्याचबरोबर तिलंचांग नावाच्या नाविक दलाच्या जहाजाची आणि पोलीस खात्याची मदत घेण्यात आली. त्याचबरोबर रविंद्रनाथ टागोर समुद्र किनार समितीच्या जीवरक्षक कर्मचाऱयांच्या पाच पथकांची बेपत्ता झालेल्यांचा शोध लावण्यासाठी मदत घेण्यात आली.

सलग दुसऱया दिवशी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी

सोमवारी आढळून झालेल्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. आणि मंगळवारी आढळून आलेले मृतदेहही पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यामुळे मयतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सलग दुसऱया दिवशी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

होडी मालक आणि चालक ताब्यात

देवबाग ऍडव्हेंचर्स बोटिंगचे मालक दयानंद जाधव, होडीचालक रंगनाथ चोपडेकर आणि अन्य तिघांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कारवार जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुर्घटनाग्रस्त होडीचे अद्याप रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नाही असे सांगण्यात आले. दरम्यान निष्पाप व्यक्तिंचा जीव घेतलेल्या होडीचालक आणि मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मयतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्याची मागणी

दरम्यान कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनी होडी दुर्घटनेतील मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मंगळवारीही रुपाली नाईक जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होत्या. मंडय़ा जिल्हय़ातील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि कारवार जिल्हय़ातील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत का? असा प्रश्न येथे अनेकांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात निदर्शनाचा प्रयत्न

 राघू नाईक हे मृतांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या समवेत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ठाण मांडून मृतांच्या कुटुंबीयांना अधिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. घटनास्थळी धाव घेतलेल्या आमदार रुपाली नाईक यांनी राघू नाईक यांना धारेधर धरले आणि निदर्शने करण्याची ही वेळ नव्हे असे सांगितले. यावेळी आमदार नाईक आणि आंदोलकांच्या दरम्यान शाब्दीक चकमकी झाल्या.

जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायाधीशांची भेट

जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायाधीश टी. जी. शिवशंकर गौडा, जिल्हा कानून सेवा प्राधिकारचे सदस्य कार्यदर्शी टी. गोविंदय्या, न्यायाधीश शिवकुमार, अमरनाथ, महेश चंद्रकांत, विवेक ग्रामोपाध्याय यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी एस. एस. नकुल आणि जिल्हा पोलीस प्रमुख विनायक पाटील यांनी होडी दुर्घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली.

पैशांच्या आशेपोटीच दुर्घटना

सदाशिवगड येथील प्रसिद्ध तबलापटू चंद्रकांत गडकर या दुर्घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदविताना म्हणाले, अधिक पैसा कमविणे हेच या घटनेमागचे कारण आहे. कूमर्गडच्या यात्रेदिवशी अधिक पैसे कमविण्याची संधी काही होडी मालक आणि चालक कमविण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळेच ते क्षमतेपेक्षा अधिक भाविकांची वाहतूक करतात. त्यादिवशी पैसे कमविण्यासाठी होडी चालकांमध्ये अक्षरशः चढाओढ लागलेली असते. अशावेळी अधिक ट्रिपा करण्यासाठी काही जणांना आपण कुठून होडी हाकत आहोत भान नसते आणि मग ते धोकादायक संगमातून होडी नेण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्घटनेला आमंत्रण देतात असे पुढे गडकर यांनी सांगितले. 

जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच दुर्घटना

कारवार जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच दुर्घटना घडल्याची प्रतिक्रिया येथील नगरसेवक आणि पत्रकार संतोष गुरुमठ यांनी नोंदविली. कूर्मगडच्या यात्रेला विविध राज्यातील हजारो भाविक सहभागी होणार याची माहिती जिल्हा प्रशासनाला होती. भाविकांची ने-आण करण्यासाठी शेकडो होडय़ांचा वापर केला जाणार याचीही माहिती जिल्हा प्रशासनाला होती. यात्रेच्यावेळी यापूर्वी दुर्घटना घडल्या आहेत, असे असताना जिल्हा प्रशासनाने कोणते खबरदारीचे उपाय हाती घेतले होते? होडीतून ये-जा करणाऱया भाविकांची संख्येची पाहणी प्रशासनाने केली होती काय? भाविकांच्या ये-जा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या होडय़ा सुरक्षित आहेत काय? होडी चालकांकडे परवाना आहे का? होडय़ांची नोंद झाली आहे का? होडीच्या मालकांकडून भाविकांना जीवरक्षक जॅकेट्स उपलब्ध करून दिले आहेत काय? याची पाहणी केली होती काय? असे प्रश्न उपस्थित करून नाईक पुढे म्हणाले, होडय़ा ये-जा करणाऱया मार्गावर सुरक्षा यंत्रणाची गस्त नसल्यामुळेच आणि जिल्हा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडली, असे नाईक यांनी पुढे सांगितले. 

काळी नदी आणि अरबी समुद्र संगम अतिशय धोकादायक

कारवारचे माजी नगराध्यक्ष आणि मच्छीमारी नेते गणपती उळवेकर ज्यांनी होडीच्या दुर्घटनेत अनेकांना वाचविले आणि मंगळवारी शोधमोहिमेत सहभागी झाले. या घटनेबद्दल बोलताना म्हणाले, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ती काळी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमची जागा अतिशय धोकादायक आहे. दुर्घटनेच्यावेळी समुद्राला भरती आली होती. पौर्णिमेच्या दिवशी आलेल्या भरतीचे स्वरुप वेगळेच असते. संगमस्थळी समुद्राचे पाणी आणि काळी नदीचे पाणी एकमेकांशी भिडते अशा परिस्थितीत होडी चालक निष्णांत पाहिजे. अशा वेळी संगमाची जागा चुकवून होडी घेऊन गेली पाहिजे. आणि नेमके हेच घडले नाही आणि परिणाम कारवार जिल्हय़ाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी दुर्घटना घडली आणि अनेकांना जीव गमवावा लागला असे पुढे उळवेकर यांनी सांगितले.