|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोस्ट अपहारातील रक्कम 25 पर्यंत न दिल्यास उपोषण

पोस्ट अपहारातील रक्कम 25 पर्यंत न दिल्यास उपोषण 

प्रतिनिधी/ साटेली-भेडशी

कोनाळकट्टा पोस्ट अपहार प्रकरणातील रवींद्र सीताराम कुबल व कुटुंबीय यांच्या बचत खात्यातील बुडीत रक्कम 25 जानेवारीपर्यंत न दिल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पाळये येथील रवींद्र सीताराम कुबल यांनी दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी कोनाळकट्टा पोस्टात अपहार झाल्याचे उघडकीस आले. या अपहारात बऱयाच ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या. याची पुढे चौकशी होऊन काही ठेवी परत मिळाल्या तर काही ठेवीदारांच्या ठेवी अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत. यातीलच पाळये येथील रवींद्र सीताराम कुबल व कुटुंबीय यांच्या बचत खात्यातील बुडीत ठेवी एकूण रक्कम रुपये पाच लाख 37 हजार 194 एवढी रक्कम येणे बाकी आहे. याबाबत कुबल यांना पोस्टात अपहार झाल्याची चौकशी झाली. त्यावेळी बचत पासबुक जमा करून त्यातील एकूण रकमेच्या पावत्या त्यांच्याकडे देण्यात आल्या. याबाबत बऱयाचदा पोस्टात चौकशी केली असता हे प्रकरण विभागीय कार्यालय पणजी येथे पाठविण्यात आले आहे, अशी प्रत्येक वेळी माहिती देण्यात येते. परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच पोस्ट विभागीय कार्यालय कोल्हापूर, सांगली या कार्यालयाकडून दोडामार्ग व सावंतवाडी येथे चौकशीसाठी
श्री. कुबल यांना बोलविण्यात आले. परंतु यासाठी ते तीन वेळा उपस्थित राहिले. मात्र, कोणतीही चौकशी प्रक्रिया झाली नाही. त्यांना निर्णयाविना माघारी फिरावे लागले. याबद्दल ते तीव्र संताप व्यक्त करत या विषयात त्यांच्या कुटुंबातील मानसिक त्रास होऊन त्यांच्या पत्नीचे निधनही झाले. झालेल्या अन्यायाबद्दल येत्या 25 जानेवारीपूर्वी न्याय न मिळाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा श्री. कुबल यांनी दिला आहे