|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गुणवत्तेत सिंधुदुर्ग पहिला आणण्याचा निर्धार

गुणवत्तेत सिंधुदुर्ग पहिला आणण्याचा निर्धार 

प्रतिनिधी / कणकवली

विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका महत्वाची असून गेली अनेक वर्षे विविध शैक्षणिक सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्हा सातत्याने गुणवत्तेत आघाडीवर आहे. यावषी आपला जिल्हा काहीसा मागे पडला असून यापुढे जिल्हा गुणवत्तेत पहिला आणण्यासाठी सिंधुदुर्गातील शिक्षक निश्चितच मेहनत घेतील, असा विश्वास  जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू नयेत म्हणून आपण सर्वांनी काम करूया, त्यासाठी प्रथम शिक्षकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवून समाजात जिल्हा परिषद शाळेबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषदेतर्फे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या संकल्पनेतून येथील वाळकेश्वर सभागृहात जिल्हय़ातील पहिल्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कणकवलीसह देवगड, मालवण व वैभववाडी तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. तालुक्मयाच्या उपसभापती सुचिता दळवी, डाएटचे प्राचार्य अरुण पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, मारुती थिटे, शशिकांत चव्हाण, वसंत महाले, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग भविष्यात नंबर वन असेल!

डाएटचे प्राचार्य अरुण पाटील म्हणाले, गेली अनेक वर्ष जिल्हय़ाने गुणवत्तेत सातत्य राखल्याबद्दल शिक्षकांचा अभिमान वाटतो. यावर्षी गुणवत्तेत काही टक्का घसरण झाली आहे, ही घसरण आपल्यासाठी कामाची संधी घेऊन आली असून भविष्यात सिंधुदुर्ग गुणानुक्रमे प्रथम नव्हे, तर महाराष्ट्रात गुणवत्तेत प्रथम असेल, असे काम आपण करूया.

शिक्षकांचा सत्कार

उद्घाटनप्रसंगी शैक्षणिक गुणवत्ता विकासात विशेष योगदान देणाऱया खारेपाटण नं. 1 या प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा तसेच तंबाखुमुक्त केंद्र म्हणून घोषित झालेल्या डामरे तिवरे केंद्राच्या केंद्रप्रमुख जुहिली सावंत व केंद्रातील सहकारी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सुमारे दोन हजारांहून अधिक शिक्षकांना एकाचवेळी शैक्षणिक परिवर्तनासाठी संबोधित करण्याची ही जिल्हय़ाच्या शैक्षणिक इतिहासातील पहिलीच वेळ असेल.  जिल्हय़ाच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी घातलेली ही ‘साद’ होती आणि या ‘साद’साठी शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाचं नितांत सुंदर रुप मुडे-डोंगरी या हॉलमध्ये पाहायला मिळालं.

गुणवत्तेच्या प्रवासावर विचारमंथन

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रथम प्रक्रिया अहवाल सादर करून गुणवत्तेच्या प्रवासात जिल्हय़ाच्या सद्यस्थितीवर विचारमंथन घडवून आणले. यात प्रगत शाळा, प्रगत केंदे, प्रगत प्रभाग, प्रगत तालुके ही आकडेवारी समाधानकारक नाही. शाळाबाहय़ मुलांची संख्या, आयएसओ मानांकन, उपक्रमशील शाळा, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, हँडवॉश स्टेशन, इत्यादी गुणवत्ता संवर्धनास पूरक क्षेत्रात अधिक काम होणे गरजेचे असल्याचे या प्रक्रिया अहवालातून दिसून आले. अध्ययन, अध्यापनातील व मूल्यमापनातील अवघड संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शैक्षणिक साहित्य गरजेचे असून बदलत्या काळानुसार अध्यापन तंत्रपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी डिजिटल शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून त्याच्या वापराचे तंत्र अवगत करण्याबाबतचे मार्गदर्शन या शिक्षण परिषदेत करण्यात आले.

शाळासिद्धीत जिल्हय़ातील सर्व शाळा अ श्रेणीत येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. सलाम फाऊंडेशनतर्फे तंबाखूमुक्त शाळा अभियानाबद्दल महेंद्र केरकर व परशुराम परब यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रामचंद्र आंगणे यांनी केले.