|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्मारक घोटाळाप्रकरणी उ. प्रदेशमध्ये ‘ईडी’चे छापे

स्मारक घोटाळाप्रकरणी उ. प्रदेशमध्ये ‘ईडी’चे छापे 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती मुख्यमंत्री असताना झालेल्या 1400 कोटींच्या स्मारक घोटाळाप्रकरणी गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लखनौमध्ये सात ठिकाणी छापे टाकले. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर खाण उत्खननप्रकरणी नुकताच ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मायावती यांच्या कार्यकाळातील घोटाळाप्रकरणी कारवाईने खळबळ उडाली आहे.

स्मारक घोटाळाप्रकरणी ईडीने गुरुवारी संबंधित विविध विभागाचे तत्कालिन अधिकाऱयांच्या निवासस्थान व कार्यालयांवर सात ठिकाणी छापे टाकले. नुकतीच सीबीआय अवैध खाण उत्खननप्रकरणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर कारवाई केली होती. ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नुकतीच बसप आणि सपामध्ये युती झाल्यामुळेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर राजकीय आकसातून कारवाई झाल्याचा आरोप या पक्षांचे नेते करत आहेत.

बहुचर्चित स्मारक घोटाळा

तत्कालिन मुख्यमंत्री मायावती यांच्या 2007-2012 या कार्यकाळात लखनौ, नोएडा आणि अन्य शहरांमध्ये परिवर्तन स्थळ, कांशीराम स्मारक, गौतमबुद्ध उपवन, बसपचे चिन्हे असणारे हत्ती पार्क याच्यासह विविध उद्याने आणि स्मारकांची बांधकामे झाली.  लोक निर्माण विभाग, नोएडा प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याची निर्मिती केली होती. यासाठी 2600 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. 2012 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता आल्यांनतर या संपूर्ण बांधकांमाची चौकशी लोकायुक्त एन. के. मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्मारक घोटाळा 14 हजार कोटींचा असून, याप्रकरणी मायावती यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी आणि बाबू सिंह कुशवाह, बसपचे 12 आमदारांसह 19 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात यावे, असे लोकायुक्तांनी 2013 मध्ये दिलेल्या अहवालात स्पष्ट केले होते. 100 अभियंत्यांसह 199 संशयित आरोपी असून, या घोटाळय़ाची चौकशी सीबीआय आणि विशेष तपास पथकाकडून करण्यात यावी, असेही म्हटले होते. यानंतर अखिलेश यादव यांच्या सरकारने या प्रकरणाची चौकशी दक्षता समितीकडे सोपवली होती. गेली पाच वर्ष झाली अद्याप याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले नाही.