|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » प्रकाश आंबेडकरांचे दबावतंत्र, वंचित बहुजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर

प्रकाश आंबेडकरांचे दबावतंत्र, वंचित बहुजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर 

ऑनलाईन टीम / अकोला : 

  प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वंचित बहूजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीत झालेल्या सभेत गुणवंत देवपारे यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली आहे. आतापर्यंत बुलडाण्यातून आमदार बळीराम सिरस्कार, नांदेडमधून  यशपाल भिंगे, यवतमाळमधून  प्रविण पवार, माढ्यातून विजय मोरे यांची नावे लोकसभेसाठी जाहीर केली आहेत.  प्रकाश आंबेडकर असेच उमेदवार जाहीर करत राहिले तर आघाडीचा गुंता कसा सुटणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय हे आंबेडकरांचे  दबावतंत्र असल्याचेही बोलले जात आहे.

कालच्या अमरावतीला वंचित बहुजन आघाडीची सभेत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या आघाडीचा लोकसभेचा पाचवा उमेदवार जाहीर केला आहे.  काँग्रेस आणि आंबेडकर ह्यांची आघाडीची घडी बसणार असे चित्र दिसत होते. मात्र प्रकाश आंबेडकर आपला एक-एक उमेदवार असाच जाहीर करत राहिले तर संभाव्य आघाडीचे  कोडे  कसे  सुटणार हा सवाल उपस्थित होत आहे. आंबेडकरांनी एमआयएमला सोबत घेत वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली आहे. राज्यात औरंगाबादपासून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेत औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, अमरावतीत जंगी सभा घेतल्या आहेत. एमआयएम आंबेडकरांसोबत असल्याने काँग्रेसने  आंबेडकरांसोबतच्या प्रस्तावित आघाडीत अडचणी येत असल्याचे  अनेकदा स्पष्ट केले  आहे. नांदेडच्या सभेत एमआयएमने  आंबेडकरांसाठी वंचित आघाडीतून बाजूला होण्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसने  त्यानंतर आघाडीची मोठी अडचण दूर होणार असल्याचे  सांगत आंबेडकरांना सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, काल अमरावतीत आंबेडकरांनी पाचवा उमेदवार जाहीर करीत आघाडीच्या शक्यता धूसर असल्याचे संकेत दिले आहेत.