|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ

वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ 

प्रतिनिधी/ बेळगाव

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे प्रदूषण तर दुसरीकडे अपघात वाढत आहेत. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे व वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. देशात दरवर्षी होणाऱया नैसर्गिक मृत्यूच्या खालोखाल सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असल्याचे बेळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक सी. एच. सुधीरकुमार रेड्डी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन, राज्य परिवहन मंडळ, पोलीस खाते, शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 30 वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रम कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा, धारवाड उत्तर विभाग परिवहन खात्याचे अप्पर आयुक्त मारुती सांब्राणी, बेळगाव परिवहन विभागाचे आयुक्त बी. पी. उमाशंकर, बेळगावचे आरटीओ शिवानंद मगदूम, पोलीस निरीक्षक महानिंग नंदगावी, क्षेत्रसंरक्षणाधिकारी राजशेखर तळवार आदी उपस्थित होते.

प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिंनीनी प्रास्ताविक सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आरटीओ शिवानंद मगदूम यांनी स्वागत केले. तर बी. पी. उमाशंकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहतुकीच्या नियमाच्या पत्रकाचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. डी. सी. राजप्पा म्हणाले, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये अपघात प्रमाणात वाढत आहे. यासाठी कॉलेजच्या तरुण-तरुणींना पालकांनी सायकल, दुचाकी देण्यापेक्षा वाहतुकीचे नियम समजावून सांगावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी, पोलीस, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते..