|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » भोसरे येथे अमोल मिटकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

भोसरे येथे अमोल मिटकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 

वार्ताहर /भोसरे :

भोसरे येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या विषयी अमोल मिटकरींनी केलेले आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव असलेल्या भोसरे (ता.खटाव) येथील ग्रामस्थांनी व पंचक्रोशितील शिवभक्तांनी निषेध म्हणून अमोल मिटकरच्या पुतळ्याचे दहन करुन मोर्चा काढण्यात आला. 

ज्या सरसेनापती प्रतापराव गुजरांनी आपल्या सहा साथीदारांना बरोबर घेऊन नेसरी येथे बहलोल खानाच्या सैन्याबरोबर लढताना वीरमरण पत्करुन इतिहासात अजरामर झाले, त्यांच्याविषयी ही व्यक्ती इतक्या खालच्या दर्जाचे वक्तव्य करतो. तसेच समाजात अशा विरपुत्रांच्या विषयी विष पसरवतो, आशा माणसाचा आम्ही धिक्कार करतो. मिटकरी यांनी संबंधित व्हिडीओ क्लीपमध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या विषयी एका शेतकरी मुलीशी अतिप्रसंग केल्याचा आरोप केला आहे. मिटकरी यांचे विधान अत्यंत निंदनीय असून आम्ही त्यांचा धिक्कार करत असल्याचे मोर्चाकरांनी सांगितले.

त्यानंतर चौकीचा आंबा येथे सर्व शिवभक्त एकत्र जमून अमोल मिटकरी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी सहाय्यक फौजदार सुधीर येवले, पोलीस गुप्त वर्ताविभागाचे घनवट, व कॉन्स्टेबल कटरे आदी उपस्थित होते. त्यानंतर औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, यांना अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीने व सरपंच नितीन जाधव यांनी ग्रामपंचायत व सरसेनापती प्रतापराव गुजर अधिष्ठानच्यावतीने कैलास गुजर यांनी निवेदन दिले.

माजी सरपंच महादेव जाधव यांनी सरकारने अमोल मिटकरीवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा तीव्र जनअंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी गावातील सर्व तरुण मंडळ ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.