|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उत्तम सादरीकरणासाठी वाचन हवेच!

उत्तम सादरीकरणासाठी वाचन हवेच! 

प्रसिध्द अभिनेत्री स्पृहा जोशीचे प्रतिपादन

प्रतिनिधी / रत्नागिरी

उत्तम सादरीकरणासाठी समृद्ध वाचन गरजेचे आहे. याबाबतीत मी स्वतःला अत्यंत भग्यवान समजते. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याने मी सूत्रसंचालन, कविता सादरीकरण व अभिनय अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांसमोर येऊ शकले.  कविता निबंधासारख्या वाचून चालत नाहीत तर त्यात जिवंतपणाची गरज असते. ‘प्रेम, का?फी आणि शब्द काही’ च्या माध्यमातून कवितांचा हा वेगळा प्रयोग आम्ही रसिकांसमोर आणत असून तो रत्नागिरीकरांना नक्कीच भावेल असा विश्वास युवा अभिनेत्री स्पृहा जोशी हिने व्यक्त केला.

ख्यातनाम कवी, गीतकार संदीप खरे यांच्यासोबतचा ‘प्रेम, कॉफी आणि शब्द काही’ हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन स्पृहा जोशी रविवारी रत्नागिरीकरांच्या भेटीला येत आहे. डोंबिवलीतील कार्यक्रमानंतरच हा दुसरा कार्यक्रम असून तो रविवारी सायंकाळी 6 वा. रत्नागिरीतील सावरकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. लांजाच्या ‘यशश्री’ संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे ‘तरुण भारत’ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारले असून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी व श्री महालक्ष्मी फुड प्रॉडक्ट्स हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

‘प्रेम’ सूत्रात बांधणी

रत्नागिरीत होणाऱया या प्रयोगाबद्दल स्पृहा जोशी खुपच उत्साही आहे. कोकणातील रसिकांची कौतुकाची थाप आमच्या सारख्या कलाकारांसाठी खूपच महत्वाची असल्याचे तिने सांगितले. प्रेमावरील कवितांचे सादरीकरणावर आधारीत या वेगळय़ा प्रयोगावर बोलताना स्पृहा म्हणाली की,  संदीप खरे आणि आमच्या पिढीत अंतर आहे. मात्र, प्रेमाबद्दलच्या भावना सारख्याच आहेत. याच भावना वेगवेगळ्या एक्सप्रेशनमधून सादर केल्या जातील. हा कार्यक्रम फ्री फ्लोईंग असेल. यात आमच्या एकमेकांशी गप्पा आहेत, किस्से आहेत. कार्यक्रमाची बांधीव संहिता नसून प्रेम या सूत्रात तो गुंफण्यात आला आहे.

‘सुर नवा…’चा अनुभव रिप्रेशिंग

‘सुर नवा ध्यास नवा’ च्या माध्यमातून सूत्रसंचालकाच्या नव्या भुमिकेत स्पृहाने वाहवा मिळवली. याबाबत विचारले असता हा अतिशय सुंदर व सुखद अनुभव असल्याचे तिने सांगितले. या कार्यक्रम वेगवेगळी टॅलेंट्स पहायला मिळाली. माझ्यासाठी हा अनुभव रिप्रेशिंग करणारा होता. सादर होणाऱया मुलांची तयारी अनुभव समृध्द करणारी होती. वयाच्या मानाने मुलांची सांगितीक जाण, तयारी अभ्यास हे सारेच लक्षणीय होते. मी जेव्हा त्यांच्या वयाची होते तेव्हा मला या गोष्टी माहितीही नव्हत्या, असे तिने सांगितले.

आताच्या काळात एक्स्पोजरमध्ये वाढ झाली आहे. तंत्रज्ञान प्रगत झालो आहे. ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी गाणी, माहिती शोधतात, ऐकतात त्याचा अनुभव  घेऊन तयारी करतात. या कार्यक्रमाच्या प्रत्येक इपिसोडमध्ये एखादा तरी क्षण असा यायचा की, हलून जायला व्हायचं. पाचवर्षी ‘मा?निटर’ हर्षदने तर सर्वांना वेड लावले. माझा चमत्कारांवर विश्वास नाही पण हे काहीतरी वेगळं पाणी आहे असे मला नेहमीच वाटत असल्याचे स्पृहा सांगते.

‘उंच माझा झोका’ मधील रमाबाई रानडे साकारणे अतिशय महत्वाचा व भाग्यकारक क्षण होता. मालिका संपून 6-7 वर्षे झाली तरी लोक या भुमिकेची आठवण काढतात. दिग्दर्शक अरुणाताई जोगळेकर आणि निर्मात विरेंद्र प्रधान यांना तिने या यशाच श्रेय दिल. असाच अनुभव ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ ने दिला.  ही मालिका संपून चार वर्षे लोटली तरी लोक त्याच्याविषयी बोलतात हे समाधानाचे आहे.

कवितांचा जिवंत अनुभव

सादरीकरण करण्यासाठी काय करावे हे सांगण्याएवढी मी अनुभवाने मोठी नाही. पण मला योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याने इथपर्यंत येऊ शकले. मी भाग्यवान आहे. सादरीकरण चांगले होण्यासाठी सतत वाचत राहिले पाहिजे. उत्तम कविता वाचल्या पाहिजेत. व्याकरणाचाही सखोल अभ्यास पाहिजे. हल्ली मुक्तछंदाचा पर्याय आहे. परंतु हा देखील एक छंदच आहे याची जाण ठेवली पाहिजे. आता निबंधासारख्या कविता वाचल्या जातात त्यामुळे रसिक कंटाळतो. तुमचे म्हणणे डोळसपणे मांडता आले पाहिजे. ‘प्रेम, का?फी आणि शब्द काही’ च्या माध्यमातून हा वेगळा अनुभव आपल्याला नक्कीच येईल असा विश्वास स्पृहाने व्यक्त केला.