|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजस्थानात गुर्जर आंदोलन सुरूच

राजस्थानात गुर्जर आंदोलन सुरूच 

रेल्वेमार्गावर निदर्शकांनी मांडले ठाण

वृत्तसंस्था/  जयपूर

गुर्जर नेते किरौडी सिंग बैंसला यांनी समर्थकांसह शुक्रवारपासून राजस्थानच्या सवाईमाधोपूर जिल्हय़ात गुर्जरांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सामील गुर्जर समुदायाचे सदस्य रेल्वेमार्गावर उतरले आहेत. गुर्जरांच्या आंदोलनामुळे रेल्वेवाहतुकीवर प्रतिकूल प्रभाव पडला असून 14 रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या आहेत. तर 20 रेल्वेगाडय़ांचे मार्ग बदलावे लागले आहेत.

निदर्शनांमुळे काही रेल्वेगाडय़ा स्थानकांवरच रोखण्यात आल्याने प्रवाशांना फटका बसला आहे. प्रवाशांकरता रेल्वे व्यवस्थापनाने हेल्पलाईन क्रमांक 0744-2467153 आणि 0744-2467149 उपलब्ध केले आहेत. गोष्टी वेगाने बदलत असून लोकांनीच मला रेल्वेमार्गावर आणले आहे. शांततापूर्ण मार्गाने निदर्शने केली जाणार असल्याचे आश्वासन बैंसला यांनी दिले आहे.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी भरतपूर विभागात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. राजस्थान आर्मी कॉन्स्टेबलरी (आरएसी) च्या 17 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या असून यात विशेष कृती दलाचा समावेश असल्याची माहिती भरतपूर विभागाचे पोलीस महासंचालक भूपेंद्र साहू यांनी शनिवारी दिली.

सरकार चर्चेस तयार

गुर्जर समुदायाशी चर्चा करण्याची तयारी राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारने दर्शविली आहे. आरोग्यमंत्री रघू शर्मा, पर्यटनमंत्री विश्वेंद्र सिंग, सामाजिक न्यायमंत्री भंवर लाल आणि वरिष्ठ अधिकाऱयांची समिती निदर्शकांसोबत चर्चा करणार आहे. राजस्थानच्या काँग्रेस सरकारने गुर्जर आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे.

गुर्जर समुदायाची मागणी

राजस्थानात गुर्जरांच्या आरक्षणाचा मुद्दा 14 वर्षांपासून सुरू असून शुक्रवारी या आंदोलनाने पुन्हा उग्र रुप धारण केले आहे. गुर्जर समुदायाने शासकीय नोकऱया, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी गुर्जर, रायका-रबारी, गडिया लुहार, बंजारा आणि गडरिया समाजाच्या लोकांसाठी 5 टक्के आरक्षणाची मागणी केली आहे.  सध्या अन्य मागास वर्गाच्या आरक्षणाच्या अतिरिक्त 50 टक्क्यांच्या कायदेशीर मर्यादेत गुर्जरांना अतिमागास शेणी अंतर्गत 1 टक्के आरक्षण मिळत आहे.