|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळमधील उड्डाण पुलाला लवकरच अंतिम मान्यता

कुडाळमधील उड्डाण पुलाला लवकरच अंतिम मान्यता 

15 रोजी दिल्ली येथे होणार महामार्ग विभागाची बैठक

वार्ताहर / कुडाळ:

कुडाळ शहरातील उड्डाण पुलाला 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे होणाऱया महामार्ग विभागाच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात येणार आहे, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना सांगितले, अशी माहिती भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष चारुदत्त देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. तालुका भाजपच्यावतीने जठार व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उड्डाण पुलासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे, असेही त्यात म्हटले आहे.

कुडाळ शहरात महामार्ग चौपदरीकरण करीत असताना शहराचे दोन भाग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शहरवासियांमध्ये नाराजी होती. हा रस्ता ओलांडतानासुद्धा वळसा घालावा लागणार होता. याबाबत जठार यांनी कुडाळ-एमआयडीसी विश्रामगृहावर कुडाळमधील विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांशी चर्चाही केली होती. तेव्हा जठार यांनी येथील उड्डाण पुलासाठी आपण गडकरी यांना विनंती करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शहरवासियांच्या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले होते. गडकरी यांनी उड्डाण पुलाला मान्यता देण्याचे कबूल केले होते. या पुलासाठी आवश्यक निधीला पंधरा फेब्रुवारीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.