|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नवनवीन उद्योग संकल्पांसाठी विशेष उपक्रम

नवनवीन उद्योग संकल्पांसाठी विशेष उपक्रम 

हिरकणी महाराष्ट्राची, डिस्ट्रिक्ट प्लान कॉम्पिटिशन : बचत गटांना प्रोत्साहन देणार – सुरेश प्रभू     

प्रतिनिधी / ओरोस:

देशाचा विकास साधताना त्या विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठीच जिल्हा व तालुकास्तरावर महिला बचतगटांच्या नवनवीन उद्योग संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. हिरकणी महाराष्ट्राची व डिस्ट्रीक्ट प्लान कॉम्पिटीशन या दोन उपक्रमांचे शनिवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी प्रभू बोलत होते.

या उद्घाटनास महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास राज्यमंत्री रणजित पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, मुख्य सचिव असिम गुप्ता आदी उपस्थित होते.

विकास प्रक्रियेत लोकसहभाग महत्वाचा

 विकास प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून प्रभू म्हणाले, लोकांनी विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. बचत गट उद्योग व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात  येत आहे. बचत गटांच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा हा उपक्रम आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासन अनेक प्रकारचे उपक्रम राबवित आहे. तसेच हा विकास ग्रामीण पातळीवर पोहोचण्यासाठी या प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून निर्माण होणाऱया वस्तूंचा आता ‘जीईएम’ अर्थात गव्हर्नमेंट इलेक्ट्रॉनिक मार्केट यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. तसेच उद्योगांच्या नवनवीन कल्पनांना व्यासपीठ मिळावे व त्याचा फायदा समाजाला व्हावा, यासाठी डिस्ट्रिक्ट प्लान कॉम्पिटिशन ही योजना राबविण्यात येत असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

दोन योजना

 या योजनेच्या माध्यमातून विकासासोबतच लोकांचे जीवनमान उंचावणे व महिला व उद्योजकांमधील नव संकल्पनांना मूर्त रुप मिळवून देणे यासाठी या दोन योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

बचतगटांना व्यासपीठ

‘हिरकणी महाराष्ट्राची’ ही महत्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून महिलांच्या बचतगटांना एक नवीन व्यासपीठ उबलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्मयातून दहा महिला बचतगट उद्योगांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड केली जाणार आहे. या दहा महिला बचतगटांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उद्योगांसाठी अर्थसहाय्य व्हावे व उद्योग वाढीसाठी भांडवल मिळावे, असा या बक्षिसाचा उद्देश असेल. तालुकास्तरावरील निवडक दहा संकल्पनांमधून जिल्हास्तरावर पाच संकल्पनांची निवड केली जाईल. निवड झालेल्या पाच महिला बचतगटांच्या संकल्पनांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स योजना निवडणार

डिस्ट्रिक्ट प्लान कॉम्पिटिशन या योजनेमध्ये कृषी, ग्रामविकास व समाजोपयोगी अशा नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स योजनांची निवड केली जाणार आहे. अशा पाच संकल्पनांची जिल्हास्तरावर निवड करण्यात येणार आहे. या संकल्पनांना पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्हय़ाचा व राज्याचा विकास होण्याच्या दृष्टीने तसेच उद्योजकांना त्यांच्या संकल्पना राबवण्यासाठी पाच लाख रुपयांची ‘वर्क ऑर्डर’ ही या योजनेंतर्गत दिल्या जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही संपूर्ण योजना पूर्ण करून राज्यभरातून आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना मूर्त रुपात येण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी बचतगट व उद्योजकांनी पुढाकार घेऊन या दोन्ही उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे.