|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पोलीस अधिकारी बारक्या भावर यांचा हृदयविकाराने मृत्यू

पोलीस अधिकारी बारक्या भावर यांचा हृदयविकाराने मृत्यू 

प्रतिनिधी/ गुहागर

रत्नागिरी मुख्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले बारक्या लहानू भावर (50) यांचे बंदोबस्तावर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेकरिता ते वेळणेश्वर येथे आले होते.

भावर यांनी मंडणगड, गुहागर, अलोरे, शिरगाव व त्यानंतर रत्नागिरी मुख्यालयात  सेवा बजावली आहे. भावर हे मुळचे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील येवली गोरखनपाडा येथील असून सध्या ते रत्नागिरी मुख्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या सुरक्षेकरिता ते शुक्रवारपासून आले होते. शनिवारी पहाटे 5 च्या दरम्यान त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. सकाळी 8 वाजता वेळणेश्वर येथील एका खासगी दवाखान्यात इसीजी काढण्यात आला. त्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले. यामुळे तातडीने वेळणेश्वरचे सरपंच नवनीत ठाकूर यांनी ग्रामपंचायतीची रूग्णवाहिका देऊन त्यांना अधिक उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र सकाळी 9.25 च्या सुमारास शृंगारतळी येथे आले असता त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले. यामुळे शृंगारतळीतील डॉ. राजेंद्र पवार यांनी त्यांना ऑक्सिजन लावून स्वतः रूग्णवाहिकेमध्ये बसून भावर यांना चिपळूणकडे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत  रामपूर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, भावर यांचा मृतदेह सायंकाळी 5.30च्या सुमारास चिपळूण पोलीस स्थानकात आणण्यात आला. यावेळी पोलिसांच्यावतीने त्यांना सलामी देण्यात आली. यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी पाठवण्यात आला.