|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागरच्या सुपुत्रांनी मिळवले नाचणी मळणी यंत्राचे पेटंट

गुहागरच्या सुपुत्रांनी मिळवले नाचणी मळणी यंत्राचे पेटंट 

प्रतिनिधी/ चिपळूण

गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील तरुण शेतकरी विकास जोयशी व सचिन गुजर यांनी आपल्या कल्पनेतून ग्रामीण शेतकऱयांची गरज लक्षात घेऊन तयार केलेल्या छोटेखानी नाचणी झोडणी यंत्राला जागतिक पेटंट मिळाले आहे.  या यंत्राच्या माध्यमातून अवघ्या एका तासात चार मण नाचणीची झोडणी होणार असून त्यासाठी अवघा 300 रूपये खर्च येणार आहे.

  गुहागरच्या सुपुत्रांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण संशोधनाला पेटंट मिळवून देण्यात सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचा महत्वपूर्ण सहभाग आहे. गेली 27 वर्षे निसर्ग संवर्धन व संरक्षण क्षेत्रात काम करत असलेल्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने गेल्या 3 वर्षापासून शेतीमध्ये लक्ष घातले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱयांनी शेती करावी, नवनवीन यंत्रांचा वापर व्हावा, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

  गुजर व जोयशी यांनी तयार केलेल्या या नाचणी यंत्राची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱयांना समजल्यानंतर त्यांनी या दोघांची भेट घेतली. शेतकऱयांचे श्रम कमी करणाऱया या यंत्राचे स्वामीत्व हक्कांची नोंदणी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पटवून दिले. संस्थेच्या सुयोग विचारे व सहकाऱयांनी त्यांच्याकडील सर्व तंत्रज्ञान माहिती करून घेतली. त्यानुसार  नितीन नार्वेकर यांनी यंत्राचे रेखाटन करून दिले, तर भाऊ काटदरे यांनी यंत्रातील नाविन्य, तांत्रिक बाबी या पेटंट नोंदणीसाठी योग्य प्रकारे नोंदी करून यंत्र पेटंट कार्यालयात नोंदणीसाठी पाठवण्यात आले.

  दरम्यान, पेटंट कार्यालयात या यंत्राबाबत सविस्तर शोध घेऊन देशभरात अशा प्रकारचे यंत्र नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर या यंत्राचे स्वामीत्व अधिकार विकास जोयशी व सचिन गुजर यांच्या नावावर नोंद करण्यात आले. आता या दोघांशिवाय इतर कोणीही अशा प्रकारचे यंत्र बनवू शकणार नाही.

  हे यंत्र 2 अश्वश्क्तींच्या इलेक्ट्रीक मोटरवर चालते. एक 200 लिटरचा ड्रम आडवा प्रेममध्ये बसवून त्याच्या आत एक कायम व एक फिरणारी अशा दोन प्रेम आहेत. त्याच्यामध्ये नाचणीची कणसे कुस्करून दाणे वेगळे होतात व त्यांना परत सडण्याची गरज नसते. हे यंत्र कोकणातल्या डोंगराळ भागात कोठेही नेणे शक्य असून त्यामुळे शेतकऱयांची एक चांगली सोय झाली आहे. या यंत्राने एका तासात सुमारे चार मण नाचणी झोडून होते व त्याला फक्त 300 रूपये एवढा खर्च येतो. आता या यंत्राद्वारे संपूर्ण कोकणात नाचणी झोडण्यासाठी सेवा कशी पुरवता येईल व या यंत्रात अजून काही बदल करत ते अधिक सोपे व उपयोगी कसे होईल, यासाठी या तरुण शेतकऱयांचा प्रयत्न चालू आहे.

   दरम्यान, शुक्रवारी कोंढर काळसूर येथे एका कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी या पेटंटची सर्व कागदपत्रे जोयशी व गुजर यांना सुपूर्द केली.  सह्याद्री निसर्ग मित्र संस्था शेतकऱयांच्या हिताच्या विविध संकल्पना राबवत आहे, त्याचा फायदा शेतकऱयांनी घ्यावा असे आवाहन करताना नवनवीन प्रयोगांना नेहमीच पाठबळ देण्याची ग्वाही दिली.