|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जे. कृष्णमूर्ती आणि त्यांची शिकवण

जे. कृष्णमूर्ती आणि त्यांची शिकवण 

फेब्रुवारी 1986 मध्ये जे. कृष्णमूर्तींच्या मृत्यूपूर्वी दहा दिवस, त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘कृष्णमूर्ती या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्यातून कार्यरत असलेल्या त्या विलक्षण प्रज्ञेचे, त्या ऊर्जेचे काय होईल?’ कृष्णमूर्तींच्या रूपाने मानवतेचा त्या परमोच्च प्रज्ञेशी, त्या विलक्षण ऊर्जेशी संपर्क होता. परंतु जेव्हा कृष्णमूर्तीनीच देहरूपाने सविस्तर उत्तर ‘जे कृष्णमूर्ती : जीवन आणि मृत्यू’ या चरित्रग्रंथात दिलेले आहे. त्या उत्तराचा आशय असा आहे, की कृष्णमूर्ती हे देहरूपाने जरी नसले तरी त्यांच्या शिकवणुकीच्या रूपाने ते सदैव मानवतेला उपलब्ध असतील. जे कोणी आत्मीयतेने त्यांची शिकवण जगण्याचा प्रयत्न करतील ते कदाचित काहीसे त्या प्रज्ञेच्या संपर्कात असू शकतील. कृष्णमूर्तींची शिकवण अमूल्य आहे, कारण त्या परमोच्च प्रज्ञेशी संपर्काचा तो एकमेव मार्ग आहे.

कृष्णमूर्तींची शिकवण त्यांच्या अनेक पुस्तकांमधून व ध्वनिचित्रफीतींमधून उपलब्ध आहे. ‘द्रष्टा हाच दृश्य असतो’ हे तिचे सूत्र आहे व मानसशास्त्रीय मुक्तता हे तिचे उद्दिष्ट आहे. कोणतीही शिकवण ही सूत्रात्मक असते, तिची आपल्या दैनंदिन जीवनाशी सांगड घातल्याशिवाय, ती आचरणात आणल्याशिवाय त्या सूत्राचा उलगडा होत नाही. कोणत्याही गोष्टीचे आचरण व पडताळणी हे कष्टाचे काम असते आणि सामान्यपणे माणसाची कष्ट करण्याची तयारी नसते. याच कारणामुळे कृष्णमूर्तींची शिकवण बऱयाच लोकांना अवघड व सर्वांसाठी नाही असे वाटते.

तंत्रविज्ञानात (टेक्नॉलॉजी) विलक्षण प्रगती करणारा मानव मानसशास्त्रीयदृष्टय़ा मात्र अजूनही मागासलेलाच आहे. त्याची मानसिकता अजूनही भय, क्रोध, हिंसा, असुरक्षितता, दु:ख, चिंता, महत्त्वाकांक्षा, आसक्ती इत्यादींनी ग्रस्त आहे. त्यामुळे मानवाचे अस्तित्व हे अत्यंत असंतुलित व धोकादायक बनले आहे. कृष्णमूर्ती त्याला मानवी चेतनेतील संकट असे संबोधतात. यातून बाहेर पडायचे असेल तर मानवाला त्याची मानसिकता बदलली पाहिजे. कृष्णमूर्तींची शिकवण ही मानवामध्ये आमूलाग्र मानसशास्त्रीय परिवर्तन कसे घडून येऊ शकेल यासंबंधी आहे. कोणत्याही गोष्टीत बदल घडवून आणण्यासाठी ती आधी समजावून घेणे आवश्यक असते व त्यासाठी त्या गोष्टीचे अवलोकन करावे लागते. मानवाला स्वतःत बदल घडवून आणायचा असेल तर त्याला स्वतःकडे बघावे लागेल व असे बघणे हे नातेसंबंधांच्या आरशातूनच शक्मय आहे.

कृष्णमूर्तींची शिकवण ही अत्यंत परखड व वस्तुस्थितीशी एकनि÷ आहे. तेथे कोणत्याही अंधश्रद्धेला, आध्यात्मिक अधिकारशाहीला वाव नाही. स्वतःमध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वतःलाच स्वतःचा प्रकाश व्हावे लोगल, दुसऱयाच्या प्रकाशाचा तेथे काहीही उपयोग नाही. कोणताही गुरु, कोणतेही पुस्तक, कोणतेही तत्त्वज्ञान, कोणतीही पद्धत, कोणतीही प्रणाली या बाबतीत उपयुक्त ठरू शकत नाही. कृष्णमूर्तींची शिकवण ही माणसातील जिज्ञासा वाढवणारी व त्याच्यात विचार निर्माण करणारी असली तरी ती माणसातील रूढ विचारांना व परंपरागत समजुतींना धक्का देणारीपण आहे. ईश्वराने मानवाला निर्माण केले नसून, मानवानेच ईश्वराला आपल्या समजुतीनुसार बनवले आहे. सामाजिक नैतिकता ही अत्यंत अनैतिक आहे. जगाला वेगवेगळय़ा देशात विभागणे हा एक टोळीवादच आहे, ज्ञान हे मानवी मनाला प्रदूषित करते, माणसाने माणसाची हत्या करणे यासारखे दुसरे निर्घृण कृत्य नाही व अशा सर्वाधिक हत्या धार्मिक कारणांवरून झाल्या आहेत. मनुष्य हा स्वतःला कितीही स्वतंत्र समजत असला तरी तो एक आज्ञाबद्ध (प्रोग्रॅम्ड) जीव आहे, अशी कितीतरी विधाने त्यांच्या शिकवणीत पहावयास मिळतात.

कृष्णमूर्तींनी मानवनिर्मित देवाचे अस्तित्व नाकारले, परंतु मानवी जीवनात अत्यंत पवित्र, विचाराने अस्पर्शित, कशानेही कलुषित न झालेले असे काही आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला, आणि त्या परम पावित्र्याचा शोध घेण्यासाठी मनही पवित्र असले पाहिजे, असे म्हटले. जगातील वर्तमान धर्म हे धर्मच नव्हेत, कारण ते रूढी, परंपरा, अंधविश्वास, अधिकारशाही (ऍथॉरिटी), ग्रंथ, कर्मकांड, इत्यादींवर आधारित आहेत. धर्म म्हणजे जीवनासंबंधीचे सत्य उलगडण्यासाठी स्वतःमधील सर्व ऊर्जा एकवटणे असा धर्माचा नवा अर्थ त्यांनी दिला.

कृष्णमूर्तींचे शिक्षणविषयक विचारही तितकेच मौलिक व क्रांतिकारक आहेत. शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे. त्यातून एक स्वकेंद्रीत मानव निर्माण न होता एक जागतिक मन निर्माण झाले पाहिजे, असे मन, की जे समग्रतेने व सर्वोपांगी विचार करू शकेल. सध्याचे शिक्षण हे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्यास मदत करण्याऐवजी त्यांना अधिकाधिक संस्कारबद्ध व स्वकेंद्रीत करत आहे. शिक्षणात भयाचा वापर हा एक प्रकारचा आतंकवाद आहे. बक्षीस व शिक्षा ही प्राण्यांना शिकवण्याची पद्धत झाली, माणसांना नव्हे, मानसशास्त्रीयदृष्टय़ा शिक्षक हा विद्यार्थ्यांइतकाच अज्ञानी व अशिक्षित आहे. शिकणे व शिकवणे या दोन वेगवेगळय़ा प्रक्रिया नसून विद्यार्थी व शिक्षक अशा दोघांनी मिळून एकत्रितपणे शिकणे ही एकच प्रक्रिया आहे. म्हणून विद्यार्थी हा शिक्षक व शिक्षक हा विद्यार्थी आहे. परीक्षेतील गुण हे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवू शकत नाहीत. एका विद्यार्थ्याची दुसऱयाबरोबर तुलना करणे म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना इजा पोहोचवणे होय. शिक्षणाविषयी अशी कितीतरी आगळीवेगळी विधाने कृष्णमूर्तींच्या शिकवणुकीत पहावयास
 मिळतात.

कृष्णमूर्तींची शिकवण ही वस्तुनि÷ व विज्ञानाधि÷ित असली तरी प्रेम हा तिचा गाभा आहे. माणसाने विज्ञानात कितीही प्रगती केली, तो अगदी चंद्रावर, मंगळावर अथवा कोणत्याही ग्रहावर पोहोचला तरी त्याच्या जीवनात जर प्रेम नसेल तर त्याचे हे सर्व यश व्यर्थ होय असे ते म्हणतात. प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे, की जी असेल तर सर्व काही आहे व जी नसेल तर काहीही नाही. मानवी जीवनात प्रेम नाही-किंबहुना ते कधीही नव्हते, म्हणूनच त्याचे जीवन समस्याग्रस्त झाले.
 प्रेमाविषयी बोलताना ते आपल्या प्रेमाविषयीच्या सर्व संकल्पना, सर्व अनुभव नाकारतात. प्रेम म्हणजे आसक्ती नव्हे, भावना नव्हे, वासना नव्हे, विचार नव्हे, स्मृती नव्हे, ईर्षा वा मत्सर नव्हे, लैंगिक संबंधही नव्हे. जेथे दु:ख असते तेथे प्रेम नसते. प्रेम हे स्थलकालनिरपेक्ष असते. ते आंधळे नसते तर प्रज्ञायुक्त असते. प्रेम ही अशी गुणवत्ता आहे, की जी मानवी जीवनाला सर्व बंधनातून मुक्त करून ते सर्जनशील बनवते, त्याला एक नवा आयाम देते.

किशोर खैरनार,