|Thursday, June 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आम्ही आपल्या मुलासारखे

आम्ही आपल्या मुलासारखे 

भगवान श्रीकृष्ण कुब्जेची अभिलाषा पूर्ण करण्याकरिता तिच्या घरी गेले आणि अक्रूरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. पण यापुढे जे घडले त्यावरून या दोघांमध्ये कोणता महत्त्वाचा भेद आहे हे स्वामी अनुभवानंदांनी मार्मिकपणे सांगितले आहे. स्वामीजी सांगतात-कुब्जेच्या मनांत स्वतःविषयी काही कामना होती. तिची इच्छा होती की भगवंताने माझ्यासाठी हे करावे. तिने भगवंताला आपले अंतरंग अर्पण केले होते, तिला भगवान हवे होते म्हणून प्रसन्न होऊन भगवान तिच्याकडे गेले. परंतु तिची मनोकामना पाहून तिला केवळ आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले. अक्रूरांची सुद्धा इच्छा होती की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी यावेत. भगवान त्यांच्या घरी पोहोचले व त्यांनी पाहिले की अक्रूरांच्या मनांत आता स्वतःसाठी कांही मागणे, कामना शिल्लक राहिलेली नाही. त्यावेळी भगवंतांनी त्यांना आपले एक कार्य सोपविले.

जेव्हापर्यंत आपल्या मनात आपल्या स्वतःसाठी काही कामना, स्वार्थ शिल्लक आहे; तोपर्यंत आम्ही भगवंताचे कोणतेही कार्य करण्यासाठी अधिकारी बनत नाही. तेव्हा आपण भगवंताच्या समक्ष जाऊनही स्वतःचाच हट्ट पुरा करू पाहतो. हे समर्पण नव्हे. आपण बहुतेक वेळा देवदर्शनासाठी जातो तेव्हा देवापुढे हात जोडून आपल्या मागण्यांची लांबलचक यादीच वाचून दाखवत असतो. ही भक्ती भोगासाठी! जेव्हा आपल्या मनातील सर्व वासना समाप्त होतात, कोणतीच कामना उरत नाही तेव्हा भगवान आमच्या माध्यमातून आपले कार्य पूर्ण करतात. जेव्हापर्यंत आपल्या मनांत काही कामना आहे तोपर्यंत आपण या संसाराचे, या देहाचे गुलाम आहोत. जेव्हा सर्व कामना सोडून देतो, मन निष्काम होते तेव्हाच घडते पूर्ण समर्पण! तेव्हा आपण भगवंताचे पार्षद बनतो. तेव्हा आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेद्वारे प्रभूच्या मनांतील इच्छा पुरी होत असते.

भगवंताला अक्रूरांकडून काही काम करून घ्यावयाचे आहे त्यावेळी भगवंताची भाषा कशी आहे पहा. भगवान अक्रूरांना म्हणतात-काका! आपण आमचे हितोपदेशक, चुलते आणि आदरणीय बांधव आहात. आम्ही आपल्या मुलासारखे आहोत. आपणच आमचे रक्षण, पालन करून आमच्यावर कृपा करायची. यावरून अक्रूरांचा अधिकार तर स्पष्ट होतोच, त्याचबरोबर श्रीकृष्णांचे संभाषण चातुर्य आणि व्यवहार कुशलताही प्रकट होते. आपल्याला व्यवहारात कुणाकडून काही काम करून घ्यायचे असते. ज्याच्याकडून काही काम करून घ्यायचे ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने अगर अधिकाराने कनि÷ असते. अशावेळी आपण त्या व्यक्तीशी कसे बोलावे? याचे उत्तम उदाहरण भगवंतांनी स्वतःच्या बोलण्यातून याठिकाणी दिले आहे. आपल्या अधिकाऱयाच्या ताठय़ात आपण केवळ आज्ञा फर्मावली, तर काम उत्तम प्रकारे पार पाडले जाईल याची खात्री देता येत नाही. याउलट आपण त्या व्यक्तीशी सन्मानाने बोललात, त्याच्या गुणांबद्दल त्याची थोडीशी स्तुती केलीत आणि नम्रपणे त्याला आपले काम सांगितलेत तर आपले काम ती व्यक्ती काळजीपूर्वक आणि तत्परतेने नक्की करेल याची खात्री बाळगा.

Ad.देवदत्त परुळेकर