|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हळदी-कुंकूवाचे वाण अक्षरभेटीला!

हळदी-कुंकूवाचे वाण अक्षरभेटीला! 

कलमठ नाडकर्णीनगर महिलांचा आदर्श अनुकरणीय – अजय कांडर

प्रतिनिधी / कणकवली:

हळदीकुंकू समारंभ महिलांसाठी उत्सव असतो. हा उत्सव जेव्हा मदत निधीच्या स्वरुपात साजरा केला जातो, तेव्हा त्याची सद्भावना एकूण समाजाची होते. कलमठ नाडकर्णीनगर येथील भगिनींनी आपल्या हळदीकुंकू वाणाची रक्कम डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राला (पुणे) दिली. हळदीकुंकू वाणाची रक्कम अक्षर भेटीला देण्याची ही संकल्पना अनुकरणीय असून नाडकर्णीनगरच्या महिलांनी या उपक्रमाच्या माध्यमातून परंपरेलाच डोळस भान दिले, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.

कलमठ-नाडकर्णीनगर येथील भगिनींनी आपल्या हळदीकुंकू वाणाची 11,111 रुपये रक्कम एका समारंभात डॉ. ढेरे संशोधन केंद्रासाठी कवी अजय कांडर यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी कांडर यांनी नाडकर्णीनगरमधील भगिनी गेली पाच वर्षे हळदीकुंकू वाणाची रक्कम विविध संस्थांना मदत म्हणून देतात. या सामाजिक भावनेच्या दातृत्वाचं कौतूक करावे, असेच असल्याचे आग्रहाने सांगितले. यावेळी पंढरीनाथ दळवी, सावंतवाडी निरामय सामाजिक संस्थेच्या संचालक वंदना करंबेळकर, संगीततज्ञ माधव गावकर, नीलिमा नाटेकर, वायंगणकर आदी उपस्थित होते. हा मदतनिधी देण्याऱया भगिनी मृदुला घासासी, सुनीता चव्हाण, दीपिका चव्हाण, विशाखा पेडणेकर, उज्वला धानजी, वैष्णवी धानजी, शीला सावंत, विमल ठाकुरदेसाई, साक्षी माळवदे, नीलाक्षी गावकर, डॉ. प्रेमलता पाटणकर, विद्या घाणेकर, शीतल सावंत, अपर्णा कारेकर आदीही उपस्थित होत्या.

कांडर म्हणाले, राज्याच्या संशोधन क्षेत्रातील डॉ. ढेरे हे आदरणीय नाव.  मूलभूत माहितीशिवाय त्यांनी संशोधन केले नाही. जात, धर्म, पंथापलिकडे त्यांनी संशोधनाचा विचार केला. त्यामुळेच त्यांनी मुस्लीम संत कवींच्या परंपरेचे संशोधन केले. नुसता शिलालेख किंवा ताम्रपट यातून इतिहासाचे पुरावे सापडत नाहीत, असे ते म्हणायचे. त्यामुळेच त्यांचे संशोधनाबाबतचे विचार पारदर्शी इतिहासाचे मूळ अस्तित्व दाखविणारे होते. त्यांच्या ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ ग्रंथाला साहित्य अकादमीने गौरविण्यात आले. कणकवलीतील रसिक अग्रणी प्रसाद घाणेकर हे ढेरे संशोधन केंद्राच्या मदतीसाठी मोफत कार्यक्रम करतात. अशा ऋषितूल्य व्यक्तीच्या नावाने चालविल्या जाणाऱया व्यक्तीच्या संशोधन केंद्राला हा मदत निधी दिल्यामुळे या निधीचा पुढील अनेक पिढय़ांसाठी उपयोग होणार आहे.

सौ. धानजी म्हणाल्या, आमच्या या उपक्रमाला प्रसाद घाणेकर यांचे दरवषी सहकार्य मिळते. आजवर अणाव संविता आश्रम, कोंडुरा येथील रेखाताई गायकवाड यांचे मूक बधीर विद्यालय, दिव्यांग विद्यालय करंजे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ बाबल अल्मेडा यांना अशी मदत देण्यात आली. यावर्षीची हळदीकुंकू वाणाची रक्कम ढेरे संशोधन केंद्राला देताना आम्हा भगिनींना आनंद होत आहे. पंढरीनाथ दळवी यांच्या हस्ते कांडर यांचा सत्कार करण्यात आला.

परंपरेला निरोगी दृष्टी

नाडकर्णीनगरातील भगिनींच्या हळदीकुंकू वाणाची रक्कम समाज उपयोगासाठी आणण्याचे कौतूक ढेरे संशोधन पेंद्राच्या सचिव तथा प्रसिद्ध लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांनी केले आहे. हा उपक्रम म्हणजे परंपरा आणि नवता यांचा मेळ घालणारा असून परंपरेला काळानुरूप नवा चेहरा देताना तिच्याकडे पाहण्याची  निरोगी दृष्टीही या उपक्रमातून दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.