|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संधी ओळखता आली पाहिजे

संधी ओळखता आली पाहिजे 

उद्योजकता मेळाव्यात अरुण वर्तक यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / सावंतवाडी:

संधी अनेकदा आपल्याला चकवून जाते. यासाठी ती ओळखता आली पाहिजे. त्यासाठी जागृत राहून योग्य संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे येथील ‘दे आसरा’ फाऊंडेशनचे प्रतिनिधी अरुण वर्तक यांनी येथे केले.

टांककर शेटय़े ट्रस्ट आणि ‘दे आसरा’ फाऊंडेशन, पुणे यांच्यावतीने आयोजित व सारस्वत बँक प्रायोजित उद्योजकता मेळावा येथील पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे बाळराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर टांककर-शेटय़े ट्रस्टचे विश्वस्त जनार्दन शेटय़े, ‘दे आसरा’चे प्रतिनिधी धनंजय खिरे, अरुण वर्तक, अटल प्रतिष्ठानचे ऍड. नकुल पार्सेकर, जिल्हा उद्योजकता विकास केंद्राच्या सुषमा साखरे, प्रवीण परब आदी उपस्थित होते.

धोके पत्करायला हवे!

यावेळी मार्गदर्शन करतांना वर्तक म्हणाले की, नवीन उद्योग सुरू करतांना कल्पकता हवी. कोणताही उद्योग उभारतांना त्यातील बारकावे ओळखता आले पाहिजेत. धोके पत्करण्याची क्षमता हवी. टीका सहन करता आली पाहिजे. आपल्याकडे नेतृत्व क्षमता हवी. तसेच जी गोष्ट करणार ती पूर्णत्वास नेणार, अशी प्रबळ इच्छा हवी.

नवे शिकण्याची तयारी हवी!

आत्मविश्वासाच्या बळावर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. नवे शिकण्याची आपली तयारी हवी. तरच आपण प्रगती करू शकतो. आपला दृष्टिकोनही आशावादी हवा. तरच आपण संकटांवर मात करू शकतो. आणि उद्योगात पाय रोवू शकतो, असेही वर्तक म्हणाले.

यावेळी धनंजय खिरे, दत्ताराम देसाई, सुषमा साखरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जनार्दन शेटय़े यांनी केले. तर आभार नकुल पार्सेकर यांनी मानले. या मेळाव्याला महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच उद्योजक, व्यापारी जयंत कुलकर्णी, प्रज्ञा मोंडकर व अन्य उपस्थित होते.