|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » बटलर-स्टोक्स यांची अर्धशतके

बटलर-स्टोक्स यांची अर्धशतके 

वृत्तसंस्था/ सेंट लुसिया

तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडने यजमान विंडीजविरूद्ध पहिल्या डावात 4 बाद 231 धावा जमविल्या. बटलर आणि स्टोक्स यांनी नाबाद अर्धशतके झळकविली.

तीन सामन्यांची ही मालिका विंडीजने यापूर्वीच 2-0 अशी आघाडी घेत जिंकली आहे. या शेवटच्या सामन्यात कर्णधार बेथवेटने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने आपल्या संघात दोन बदल केले. क्यूरेन आणि फोकेस यांच्या जागी जेनिंग्ज आणि मार्क वूड यांना संधी देण्यात आली. विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. पॉल, गॅब्रियल आणि जोसेफ यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांवर चांगलेच दडपण आणले. 17 व्या षटकांत पॉलने जेनिंग्जला झेलबाद केले. त्याने 8 धावा जमविल्या. बर्न्स आणि डेनेली या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 39 धावांची भर घातली पण पॉलने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना बर्न्सला पायचीत केले. त्याने एक चौकारांसह 29 धावा जमविल्या. गॅब्रियलने डेनेलीला पायचीत केले. त्याने 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. जोसेफने कर्णधार रूटला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. इंग्लंडची स्थिती यावेळी 47.5 षटकांत 4 बाद 107 अशी केविलवाणी होती.

बटलर आणि स्टोक्स या जोडीने इंग्लंडचा डाव सावरला. पाचव्या गडय़ासाठी या जोडीने अभेद्य 124 धावांची भागिदारी केल्याने इंग्लंडने दिवसअखेर 83 षटकांत 4 बाद 231 धावापर्यंत मजल मारली. बटलर 123 चेंडूत 9 चौकारांसह 67 तर स्टोक्स 130 चेंडूत 6 चौकारांसह 62 धावांवर खेळत आहेत. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर थांबविला. खाते उघडण्यापूर्वी विंडीजकडून बटलरला जीवदान मिळाल्याने त्याने या जीवदानाचा लाभ उठविला. विंडीजतर्फे पॉलने 42 धावांत 2 तर गॅब्रियल आणि जोसेफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड प. डाव- 83 षटकांत 4 बाद 231 (बटलर खेळत आहे 67, स्टोक्स खेळत आहे 62, बर्न्स 29, जेनिंग्ज 8, डेनेली 20, रूट 18, पॉल 2/42, गॅब्रियल 1/44, जोसेफ 1/56).