|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » न्यूझीलंडचा भारतीय महिलांना व्हाईटवॉश

न्यूझीलंडचा भारतीय महिलांना व्हाईटवॉश 

तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यातही भारत दोन धावांनी पराभूत,

वृत्तसंस्था/ हॅमिल्टन

येथील हॅमिल्टनच्या मैदानावर स्मृती मानधनाच्या (62 चेंडूत 86) फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला यजमान न्यूझीलंडविरुद्ध तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताचा अवघ्या 2 धावांनी पराभव झाला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 7 बाद 161 धावा केल्या. प्रत्युतरात खेळताना भारतीय संघात मिताली राजला अखेर संधी मिळाली, पंरतु संघाला विजय मिळवून देण्यात ती असमर्थ ठरली. भारतीय संघाला 4 बाद 159 धावाच करता आल्या.

नाणेफेक जिंकत न्यूझीलंड महिला संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर सोफी डिव्हाईनच्या शानदार खेळीच्या जोरावर यजमान संघाने 20 षटकांत 7 बाद 161 धावा जमवल्या. सोफीने 52 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 72 धावा फटकावल्या. तिला सुझी बेट्स (24), कर्णधार सेथरवेट (31) यांनी चांगली साथ दिली. फटकेबाजीच्या प्रयत्नात इतर खेळाडूंनी निराशा केल्यामुळे किवीज संघाला 161 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून दीप्ती शर्माने 2, मानसी जोशी, राधा यादव, पूनम यादव, अरुधंती यांनी एकेक गडी बाद केला.

स्मृतीची अर्धशतकी खेळी व्यर्थ, मितालीचे बॅडलक

न्यूझीलंडने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रिया पुनिया (1) स्वस्तात बाद झाली. यानंतर स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दुसऱया गडय़ासाठी 47 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या जोडीची भागीदारी 9 व्या षटकांत संपुष्टात आली. जेमिमाला (21) धावांवर डेव्हिनने बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही (2) फारशी चमक दाखवता आली नाही. यानंतर, स्मृतीने मिताली राजसोबत संयमी खेळ केला. दरम्यान, स्मृतीने अर्धशतक पूर्ण केले. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात ती बाद झाली. तिने 62 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 86 धावांचे योगदान दिले. टी-20 क्रिकेटमधील तिची ही सर्वोत्तम खेळी ठरली.

यानंतर, अखेरच्या षटकांत भारतीय संघाला विजयासाटी 16 धावांची गरज होती. यावेळी मिताली व दीप्ती यांनी विजयासाठी जोरदार संघर्ष केला पण त्यांना यश आले नाही. पहिल्या चेंडूवर मितालीने चौकार खेचला तर दुसऱया चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर दीप्तीने चौकार खेचून धावा व चेंडू यातील अंतर कमी केले. पुढील चेंडूवर दोन धावा घेत भारतीय खेळाडूंनी किवींच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. अखेरच्या एका चेंडूवर 4 धावांची गरज असताना मितालीला केवळ एकच धाव घेता आली. अखेर भारताला हा सामना दोन धावांनी गमवावा लागला. हा सामना जिंकत यजमानांनी मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 161 (सोफी डिव्हाईन 72, सुझी बेट्स 24, सेथरवेट 12, दीप्ती शर्मा 2/28).

भारत 20 षटकांत 4 बाद 159 (स्मृती मानधना 86, जेमिमा रॉड्रिग्ज 21, मिताली राज नाबाद 24, दीप्ती शर्मा नाबाद 21, सोफी डिव्हाईन 2/21, केर 1/26).