न्यूझीलंडचा रोमांचक 4 धावांनी विजय

2-1 फरकाने मालिका न्यूझीलंडकडे, मुनरो सामनावीर
न्यूझीलंडने भारताचे मालिकाविजयाचे स्वप्न धुळीस मिळविताना येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात भारतावर केवळ 4 धावांनी रोमांचक विजय मिळवित मालिकेत 2-1 अशा फरकाने बाजी मारली. या सामन्याने भारताचा सर्वात यशस्वी ठरलेला तीन महिन्यांचा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौराही समाप्त झाला. 72 धावांची खेळी करणाऱया मुनरोला सामनावीराचा तर टिम सेफर्टला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.
भारताने ऑस्ट्रेलिया दौऱयात ऐतिहासिक कसोटी व वनडे मालिकाविजय मिळविला. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये आजवरचा सर्वात मोठा वनडे मालिकाविजय मिळविला. टी-20 मालिकाही जिंकली असती तर या यशावर कळस चढला असता. मात्र यजमान संघाने शेवटच्या षटकात अतिशय संयम राखत एक रोमांचक विजय मिळवून भारताचा स्वप्नभंग केला. टी-20 च्या नऊ मालिका जिंकल्यानंतर व एक मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर भारताने गमविलेली ही पहिलीच टी-20 मालिका आहे. भारताला 213 धावांचे विजयाचे आव्हान मिळाले होते. पण ते अगदी थोडक्यात कमी पडल्याने मालिका गमवावी लागली.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर न्यूझीलंडने फलंदाजीस अनुकूल असणाऱया सेडॉन पार्कच्या छोटय़ा सीमारेषांचा पुरेपूर लाभ घेत भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्ला करीत 20 षटकांत 4 बाद 212 अशी भक्कम धावसंख्या उभारली. सलामीवीर कॉलिन मुनरोने 40 चेंडूत 72 धावांची बरसात करताना टिम सेफर्ट (43) समवेत 80 धावांची दमदार सलामी देत मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. भारतीय गोलंदाजात कृणाल पंडय़ा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 54 धावा दिल्या. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (2-26) मधल्या षटकांत आणि भुवनेश्वर कुमारने (1-37) किफायतशीर मारा केल्यामुळेच न्यूझीलंडला याहून मोठी धावसंख्या गाठता आली नाही.
रोहितची संथ फलंदाजी
अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा नेहमीच स्फोटक फलंदाजी करतो. पण यावेळी तुलनेने संथ खेळ झाला. त्याने 32 चेंडूत 38 धावा जमविल्याने पाठलाग करताना भारतावर दडपण आले. विजय शंकरने (28 चेंडूत 43) उपयुक्त धावा काढल्या. पण सलामीवीर शिखर धवन (5) स्वस्तात बाद झाला. ऋषभ पंत (12 चेंडूत 28 धावा) व हार्दिक पंडय़ा (11 चेंडूत 21 धावा) जबरदस्त फटकेबाजी करीत भारतीय आव्हान जिवंत राखण्याचा प्रयत्न केला. पण धावांचा ओघ वाढविण्याच्या प्रयत्नात दोघेही बाद झाले. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही (4 चेंडूत 2) फार काही करू शकला नाही.
शेवटच्या षटकात भारताला 16 धावांची गरज होती. दिनेश कार्तिकने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यानंतर तिसऱया चेंडूवर धाव घेण्याचे टाळले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण नॉनस्ट्रायकरवरील कृणाल त्याच्या जवळ येऊन पोहोचला असतानाही कार्तिकने त्याला परत पाठविले. साऊदीचा हा चेंडू वाईड पडला होता. पण पंचांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. साऊदीच्या पुढच्या चेंडूवर कार्तिकने एक धाव घेतली. यावेळी सामना भारताच्या हातून पूर्णपणे निसटला होता. कार्तिक व कृणाल यांनी केवळ 28 चेंडूत 63 धावांची अभेद्य भागीदारी करून भारताला विजय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न शेवटी अपुरेच पडले. कार्तिकने 16 चेंडूत नाबाद 33 तर कृणालने 13 चेंडूत नाबाद 26 धावा फटकावल्या.
या सामन्यात न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय गोलंदाजांपेक्षा किंचित सरस ठरले त्यांनी सातत्याने शॉर्ट ऑफ लेंग्थ टप्प्यावर मारा करीत भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. स्थिर गतीने धावा होत असताना अधूनमधून चौकार मिळत होते. पण पंतने जोरदार फटकेबाजी करीत हा ओघ वाढविला होता. त्याने सोधी व सँटनर यांना षटकार मारले. पण ब्लेअर टिकनरने त्याची खेळी संपुष्टात आणली. हार्दिकनेही फटकेबाजी केली. पण तोही पंतप्रमाणेच बाद झाला.
त्याआधी भुवनेश्वरने अचूक मारा करीत किवी फलंदाजांना जखडून ठेवले होते. निर्धाव चेंडू वाढल्यानंतर विजय शंकरवर सेफर्टने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्याला एकदा जीवदानही मिळाले. धावांचा ओघ बऱयापैकी राखत किवीजने 5.2 षटकांत अर्धशतक फलकावर लावले. पहिल्या 7 षटकांत त्यांनी 79 धावा वसूल केल्या. रोहितने कुलदीपला आणल्यावर धावगतीला बेक लागला. त्याने सेफर्टला यष्टिचीत करवले. अर्धशतकवीर मुनरोने कृणालला षटकार ठोकत 11 व्या षटकांत न्यूझीलंडचे शतक फलकावर लावले. कुलदीपने त्याला बाद केले आणि खलील अहमदने विल्यम्सनला 27 धावांवर बाद केले. डॅरील मिचेलने 19 व रॉस टेलरने 7 चेंडूत नाबाद 14 धावा काढल्या. शेवटच्या पाच षटकांत न्यूझीलंडंने तब्बल 61 धावा झोडपत संघाला दोनशेपारची धावसंख्या गाठून दिली.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 4 बाद 212 -सेफर्ट 43 (25 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), मुनरो 72 (40 चेंडूत 5 चौकार, 5 षटकार), विल्यम्सन 27 (21 चेंडूत 3 चौकार), डी ग्रँडहोम 30 (16 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), डॅरील मिचेल नाबाद 19 (11 चेंडूत 3 चौकार), टेलर नाबाद 14 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 7. गोलंदाजी : कुलदीप 2-26, भुवनेश्वर 1-37, खलील अहमद 1-47, हार्दिक 0-44, कृणाल 0-54.
भारत 20 षटकांत 6 बाद 208-धवन 5 (4 चेंडूत 1 चौकार), रोहित शर्मा 38 (32 चेंडूत 3 चौकार), विजय शंकर 43 (28 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), पंत 28 (12 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), हार्दिक 21 (11 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), धोनी 2 (4 चेंडू), दिनेश कार्तिक नाबाद 33 (16 चेंडूत 4 षटकार), कृणाल नाबाद 26 (13 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), अवांतर 12. गोलंदाजी : सँटनर 2-32, मिचेल 2-27, टिकनर 1-34, कुगेलीन 1-37, साऊदी 0-47, सोधी 0-30.
बॉक्स
विलक्षण योगायोग
भारत व न्यूझीलंडच्या पुरुष व महिला दोन्ही संघांचे सामने एकाच दिवशी झाले. पुरुषांप्रमाणे भारतीय महिला संघालाही शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. मात्र महिलांनी 13 धावा काढल्या तर पुरुष संघाला केवळ 11 धावांच करता आल्या. त्यामुळे पुरुषांना 4 तर महिलांना केवळ 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
धोनी भारताचा पहिला ‘त्रिशतक’वीर
यष्टिरक्षक फलंदाजी धोनीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला असून 300 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताचा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. 300 किंवा त्याहून अधिक सामने खेळणाऱयांत तो आता संयुक्त 12 व्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या ल्युक राईटनेही 300 सामने खेळले आहेत. धोनीने टी-20 कारकिर्दीत 6136 धावा 38.35 च्या सरासरीने बनविल्या असून त्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 298 सामने खेळले असून तो दुसऱया एकंदर 13 वा) स्थानावर आहे. याशिवाय सुरेश रैनाने 296, दिनेश कार्तिकने 260 सामने खेळले आहेत. विंडीजचा अष्टपैलू कीरन पोलार्ड सर्वाधिक 446 सामने खेळले असून त्याने 43 अर्धशतकांसह 8753 धावा 29.97 च्या सरासरीने बनविल्या आहेत. त्