|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नंबरींग..क्लिनिंग झाले..प्रत्यक्षात रस्त्याच्या कामास सुरुवात कधी

नंबरींग..क्लिनिंग झाले..प्रत्यक्षात रस्त्याच्या कामास सुरुवात कधी 

 

प्रतिनिधी/ वडूज

सुमारे सहा महिन्यापूर्वी बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते वडूज-वाकेश्वर या चार कि.मी. लांबीच्या रस्त्याचे भूमिपूजन झाले. मात्र प्रत्यक्षात अद्याप कामास सुरुवात नाही. प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थांनी तगादा लावल्यानंतर ठेकेदाराने मागील दोन महिन्यापूर्वी नंबरींग केले. त्यानंतर एका महिन्याच्या विसाव्यानंतर दोन दिवस जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने बाजूची काटेरी झाडे-झुडपे काढून क्लिनिंगही करण्यात आले आहे. आता ठेकेदार पुन्हा एकदा विश्रांतीवर गेल्याने ग्रामस्थ व भाजपा कार्यकत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम प्रशासन व ठेकेदाराने ग्रामस्थांच्या लोकभावनेचा अंत पाहू नये. अश्या भावना व्यक्त होत आहेत.

 वडूज या तालुक्याच्या गावापासून केवळ हाकेच्या अंतरावर म्हणजे 4 कि.मी. वर सुमारे 2 हजार लोकवस्तीचे वाकेश्वर हे गांव आहे. गावाला जोडणारा वडूज-वाकेश्वर हा प्रमुख मार्ग आहे. गावातील शेकडो वाहने या रस्त्यावरुन ये-जा करत असतात. त्याचबरोबर गौनखनिजाचा अतिरीक्त भार नेहमीच या रस्त्याने सोसला आहे. प्रमुख कार्यकत्यांनी वारंवार आवाज उठवून वरिष्ट स्तरापर्यंत प्रयत्न करुन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम मंजूर करुन आनले. 14 मे रोजी या कामाचा महसूल तथा बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन समारंभही दिमाखात पार पडला. मात्र अद्याप हे काम प्रत्यक्षात सुरु झाले नाही. सद्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. कामाचा कार्यारंभ आदेश मिळूनसुध्दा ठेकदाराकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. येत्या आठ दिवसात काम सुरु झाले नाही तर ग्रामस्थ व विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र फडतरे, भा.ज.यु.मो. चे तालुका उपाध्यक्ष किरण जाधव तसेच महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा शुभांगी भांडवलकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

प्रशासनाची अनास्था

यासंदर्भात तांत्रिक माहिती घेण्यासाठी अभियंता भोसले यांना दोनवेळा फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याचीही तसदी घेतली नाही. तर कार्यकारी अभियंता श्री. कदम यांनी लवकरच रस्त्यावरील साकव पुलाचे काम सुरु करतो असे सांगितले. सदरचे काम एका ठेकेदार कंपनीच्या नावावर आहे. तर प्रत्यक्षात दुसराच ठेकेदार काम करत आहे. प्रत्यक्ष काम सुरु करण्यास नक्की कोणाची अडचण आहे. हे समजत नाही.