|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘रयत’ महोत्सवासाठी देणगीचे फर्मान

‘रयत’ महोत्सवासाठी देणगीचे फर्मान 

विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती मागितली जातेय देगणी;

प्रतिनिधी\ सातारा

रयत शिक्षण संस्थेचा ‘शताब्दी महोत्सवी वर्ष’ साजरा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्यावतीने प्रत्येक विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनीकडून 500 रुपये देणगी देण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. तसेच ही रक्कम भरल्याशिवाय त्यांना परीक्षा फार्म भरता येणार नाही, असे कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले असून यास विद्यार्थ्यांनी विरोध करत आंदोलन केले आहे. सध्या कॉलेजचे प्राचार्य कानडे हे रजेवर असून उपप्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पैसे भरण्याची सक्ती नसल्याचे सांगत सारवासारव केली. तसेच पुढील निर्णय प्राचार्य कानडे आल्यावर घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

   शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे ओळखून सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. यंदा संस्थेचा ‘शताब्दी महोत्सवी वर्ष’ साजरा करण्यात येत असताना याच संस्थेचे ‘अ’ मानांकन मिळालेले यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी अजब फर्मान काढले आहे. या शताब्दी महोत्सवी वर्ष आणि पुढील शैक्षणिक सुविधांसाठी 500 रुपये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले आहे. तशी महाविद्यालयात नोटीस लावण्यात आली असून ही देगणी न देणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा फार्म भरता येणार नसल्याचेही कॉलेजकडून सांगण्यात आले आहे.

   दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती सारखी नसल्याने सर्वांना ती देणगी देणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांनी यास विरोध करत आंदोलन केले. तसेच हे आंदोलन शांत करण्यासाठी कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचे ही काम सुरू होते. मात्र, विद्यार्थ्यांनी पैसे भरणार नसल्याचे ठामपणे सांगितल्याने हा निर्णय प्राचार्याच्या समोर मांडण्यात येईल, तेच निर्णय घेतील, असे कॉलेजकडून सांगण्यात आले. प्राचार्य कानडे रजेवर असल्याने त्यांच्या उपस्थितीत देगणीची नोटीस काढण्यात आली आहे.::

प्राचार्य कानडेच निर्णय घेतील!

वाय.सी सारख्या कॉलेजला नॅककडून नुकतेच ‘अ’ नामांकन मिळाले आहे. तसेच नुकताच 5 कोटी निधी मिळालेल्या नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून देणगीच्या नावाखाली पैसे जमा करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात उपप्राचार्य देशमुख यांना विचारणा केली असता, त्यांनी विद्यार्थ्यांना देणगीसाठी कोणतीही सक्ती नाही. तसेच प्राचार्यांच्या उपस्थितीत ही नोटीस काढण्यात आली असून ज्यांना देणगी द्यायची आहे, त्यांनीच द्या, तसेच प्राचार्य कानडे सध्या रजेवर असल्याने तेच या देणगी संदर्भात निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.: