|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तांत्रिक तपासणीनंतरच हाती घेणार महामार्ग पुलांची कामे

तांत्रिक तपासणीनंतरच हाती घेणार महामार्ग पुलांची कामे 

चिपळूण / प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाच्या कशेडी ते झाराप या तिसऱया टप्प्यातील 289 कि. मी.च्या चौपदरीकरणात रखडलेल्या 13 पुलांची कामे पूर्ण करण्यासाठी आता त्या -त्या टप्प्यात काम करणाऱया कंत्राटदार कंपन्यांनाच गळ घालण्यात आली आहे. असे असले तरी गेल्या दीड-दोन वर्षापासून थांबलेल्या कामांची तांत्रिक तपासणी केल्यानंतरच ते काम हाती घेण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पुलांची कामे सुरु होण्यास अजून महिनाभराचा कालावधी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे..

महामार्ग चौपदरीकरणात खेड तालुक्यातील कशेडी ते सिंधुदुर्गपर्यत एकूण 13 मोठे पूल असून यातील बहुतांशी पुलांच्या कामाना प्रारंभ झाल्यानंतर साधारणपणे गेल्या दीड-दोन वर्षापासून ही पुलांची कामे मुख्य ठेकेदार व पोटठेकेदार यांच्यातील वादामुळे थांबली ती आजतागायत सुरु झालेली नाहीत. काही लहान पुलांची कामे सुरु झालेली नसली तरी झालेल्या पुलांमध्ये सुमारे 70 टक्के कामे पूर्ण झाले असल्याने शिल्लक 30 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी प्रथम चिपळूण ते झारापपर्यंत 3 टप्पे करून त्यातील पुलांसाठी स्वतंत्र तीन निविदा काढल्या गेल्या. मात्र एकाही कंत्राटदार कंपनीकडून या निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, नव्याने पुन्हा निविदा काढल्यास त्यात जाणारा वेळ लक्षात घेऊन सद्यस्थितीत या टप्प्यात ज्या कंपन्या काम करत आहेत, त्यांच्याकडेच या पुलांची कामे पूर्णत्वाची जबाबदारी दिली गेल्यानंतर या कंपन्यांनीही काम करण्यास होकार दर्शवला आहे.

एप्रिलमध्ये पुलांच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता

दरम्यान, रखडलेल्या या पुलांच्या कामांची तांत्रिक तपासणी महत्वाची ठरणार आहे. कारण झालेल्या कामांत काही त्रुटी राहून गेल्या असतील अथवा कोकणातील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन अर्धवट राहिलेल्या कामांवर कोणता परिणाम झालेला आहे अथवा नाही, याची तपासणी करून मगच या कामाला हात घालण्याचे या कंपन्यांनी ठरवलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे या कामांची तांत्रिक तपासणीसाठी आग्रह धरला जात आहे. येत्या महिनाभरात या बाबतची प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलमध्ये या पुलांच्या कामाला सुरुवात होऊ शकते, अशी माहिती महामार्ग विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.