|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘ड्रग्ज’ मध्ये अडकलेल्या पोलिसांची गय नाही

‘ड्रग्ज’ मध्ये अडकलेल्या पोलिसांची गय नाही 

प्रतिनिधी/ पणजी

ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विनोद मालवणकर याच्याबाबतचा अहवाल पोलीस मुख्यालयात आल्यावर त्याला निलंबीत केले जाईल. नंतर त्याच्या विरोधात कार्यालयीन चौकशी सुरु होईल, असे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या पोलिसांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही मुक्तेश चंदर म्हणाले.

कॉन्स्टेबल विनोद मालवणकर वाहनचालक म्हणून एस्कॉर्ट विभागात काम करीत होता. शनिवारी अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारून त्याला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून 10 ग्रॅम चरस जप्त केला आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

कोलवाळ तुरुंगात कैद्यांना मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज पुरविला जात असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. या प्रकरणात अनेक जेलगार्डना निलंबीत करण्यात आले असून त्याच्याबाबत तपासकाम सुरु आहे. या जेलगार्डपर्यंत ड्रग्ज कोण पुरवित होता ते अद्याप उघड झाले नाही. संशयित विनोद मालवणकर हा एस्कॉर्ट विभागात चालक म्हणून काम करीत असल्याने तो रोज कोलवाळ तुरुंगात जात होता. तसेच तुरुंगातील काही जेलगार्डशी त्याचे चांगले संबंध होते. एकूणच कोलवाळ तुरुंगातील जेलगार्डना संशयित विनोद मालवणकर ड्रग्ज पुरवित होता की काय असा संशय निर्माण झाला आहे.   

राज्यातील ड्रग्ज व्यवसाय प्रकरणात पोलीस गुंतल्याचे प्रकार अनेकवेळा उगडगीस आले आहेत. पोलीसच नव्हे तर काही राजकारण्यांचेही त्यात हात गुंतलेले आहेत. 2006 सालात ड्रग्ज माफियांशी पोलिसांचे लागेबांधे हे प्रकरण बरेच गाजले होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. मात्र न्या प्रकरणात अनेक पोलासांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र नंतर या प्रकरणाचे काय झाले ते कुणालाच माहीत नाही. ज्या पोलिसांवर कारवाई झाली होते ते पोलीसही पुन्हा पोलीस खात्यात नोकरी करीत आहेत. खरोखरच कुणावर कारवाई झाली होती की सगळाच बाहुल्यांचा खेळ झाला होता. म्हणूनच की काय  पोलीस कर्मचाऱयांच्या वागणुकीत काही बदल झालेला दिसून येत नाही. आजही काही पोलीस ड्रग्ज व्यवसायात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.