|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जिंकण्याचा निकष लावूनच उमेदवारी द्यावी

जिंकण्याचा निकष लावूनच उमेदवारी द्यावी 

प्रतिनिधी/ पणजी

मांद्रे मतदारसंघात पोटनिवडणुकीची उमेदवारी देताना जिंकण्याचा निकष लावूनच उमेदवारी देण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी मुख्यमंत्री व मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली आहे. 2017 मधील विधानसभा निवडणुकीत जो कौल मांद्रेतील मतदारांनी दिला नेमकी विरुद्ध स्थिती आज असल्याचेही पार्सेकर यांनी सांगितले.

एखाद्या त्रयस्त संस्थेला या मतदारसंघाचे सर्वेक्षण करायला सांगावे. ज्यांची इच्छा आहे अशा सर्वच उमेदवारांची नावे देऊन सर्वेक्षण करावे. वस्तूस्थिती काय आहे ती लक्षात येईल. नंतरच भाजपने उमेदवारी द्यावी. उमेदवारी आपल्यालाच मिळायला हवी असा आपला आग्रह नाही, पण योग्य निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

मांद्रे मतदारसंघातील मतदार हे बरेच जागृत आहेत. मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे हे मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मतदारानाही बरेच काही कळून चुकले आहे. आपण कोणती चूक केली हेही मतदार जाणून आहेत. आपल्या कारकीर्दीत झालेली विकासकामे, योजना, रोजगाराभिमुख प्रकल्प यांची जाणीव मतदारांना आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत कोणत्या विकास कामांचा पाठपुरावा झाला हेही जनता पहात आहे. केवळ नोकऱया देण्यासाठी पक्ष सोडला एवढय़ा कारणावर मतदार विश्वास ठेवू शकत नाहीत.

राजीनामा का दिला याचे उत्तर सोपटेंशी नाही

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन दयानंद सोपटे यांनी भाजपात प्रवेश केला मात्र राजीनामा का दिला याचे उत्तर ते मतदारांना देऊ शकत नाही. राजीनाम्याच्या बदल्यात आपल्याला काही मिळाले नाही असे ते शपथेवर सांगतात, पण मांद्रे मतदारसंघातील मतदार हे चतुर व चाणाक्ष आहेत. मुख्यमंत्र्यांनी नोकऱया देतो असे आश्वासन दिल्याचे ते लोकांना सांगतात. मुख्यमंत्री बिचारे आजारी आहेत. आपण त्यांना काहीही विचारु शकत नाही. केवळ त्यांच्या आजाराबाबत आपण विचारपुस केली.

अगोदर नोकऱया निर्माण करायला हव्यात

नोकऱया देण्यासाठी मतदारसंघात नोकऱया निर्माण करणारे प्रकल्प आणावे लागतात. आपण तुये इलेक्ट्रॉनिक सिटीचा प्रकल्प आणला. त्यासाठी 60 कोटींचा निधीही मिळाला. नवे इस्पितळ उभारले. त्यामध्ये 350 ते 400 रोजगार आहेत. मोपा विमानतळ प्रकल्प आहे. पाणी प्रक्रिया प्रकल्प आहे.

नोकऱया निर्माण करायची इच्छा असती तर सोपटे यांनी या प्रकल्पांचा पाठपुरावा केला असता. विधानसभेत किंवा विधानसभेबाहेर प्रश्न उपस्थित केले असते. आपण आणलेल्या प्रकल्पांना पुढे न्यायचे नसेल तर त्यांनी स्वतः प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. आज मतदारांनाही पटले आहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघातील मतदार गांभीर्याने विचार करीत आहेत.

नेत्यांच्या भूमिकेवर नाराज होतो

सोपटे यांना भाजपात प्रवेश देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही म्हणून आपण नाराज होतो. ज्याने भाजपच्या विरोधात निवडणूक लढविली त्यालाच आणले यामुळेही आपली नाराजी होती. आपण प्रसारमाध्यमांनी विचारले म्हणून भूमिका व्यक्त केली. आपण स्वतः माध्यामासमोर गेलो नाही. आपल्याशी बोलून निर्णय घेतला असता तर गोष्ट वेगळी होती. याअगोदर ऍड. रमाकांत खलप यांनाही आणले होते. त्यावेळी आपण प्रदेशाध्यक्ष होतो. आता चूक सुधारायला हवी. काँग्रेसचा एक आमदार कमी केला. यामुळे आता भाजपचा एक आमदार वाढवायला हवा. ते कामाचे असेल तर जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी. याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मांद्रे मतदारसंघात आज बहुसंख्य तरुण हे उच्च शिक्षित आहेत. यापैकी 75 टक्के हे आपले विद्यार्थी आहेत. त्यांना आज नोकऱया हव्या आहेत. आपल्या कारकिर्दीत कोणते प्रकल्प आले हे त्यांना माहीत आहे. हे प्रकल्प पुढे न्यायचे असतील तर आपण तिथे हवा हेही ते जाणून आहेत. त्यामुळे त्यांचाही आग्रह आहे. आपण भाजपचा पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे. भाजप सोडून निवडणूक लढविणे हा विचार आपण करु शकत नाही. मतदारसंघ आजही भाजपचाच आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी असा आग्रह मतदारांचा आहे. स्वतः या गोष्टी आपल्याशी उघडपणे बोलतात असेही ते म्हणाले. अनेकजण हवेत आहेत. नोकऱया देतो असे सांगून मते मिळतील असे त्यांना वाटते. पण ते चुकीचे आहे. मांद्रे मतदारसंघातील मतदार हे बरेच हुशार आहेत. व योग्यवेळी योग्य निर्णय घेतात असेही पार्सेकर यांनी सांगितले.