|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बोगस कागदपत्रांना उधाण

बोगस कागदपत्रांना उधाण 

बेळगाव

तहसीलदार कार्यालयातून नागरिकांना शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते. मात्र, या कार्यालयाच्या परिसरात असलेल्या गाळय़ांतून खासगी व्यवसायधारक बोगस कागदपत्रे देऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचाऱयांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱयांनी या प्रकाराकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

 जुन्या तहसीलदार कार्यालयापासून जवळच असलेल्या कचेरी गल्लीतील एका गाळय़ात शुक्रवारी असा गैरव्यवहार करताना प्रांताधिकारी व तहसीलदारांनी धाड टाकून बोगस कागदपत्रांची पूर्तता करणाऱया व्यावसायिकाच्या गाळय़ाला टाळे ठोकले. या कारवाईत गाळय़ातील सामग्री जमा करून पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला. अशाप्रकारे बोगस कागदपत्रे बनविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन अशाप्रकारे चालू असलेल्या बोगस व्यावसायिकांच्या विरोधात त्वरित कारवाई करून सामान्य जनतेला फसवणूक होण्यापासून रोखले पाहिजे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, शासनाची मान्यता न घेता काही खासगी क्यावसायिकांनी शासकीय कागदपत्रे देण्याचा बेकायदेशीर व्यवसाय थाटला आहे. याद्वारे बोगस आधार कार्ड व इतर शासकीय कागदपत्रे तयार करून गरीब जनतेची व शासनाची  फसवणूक करत आहेत. ग्राहकांच्या हाताचे ठसे न घेताच बोगस पद्धतीचे आधार कार्ड बनविली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

बेळगाव तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या तहसीलदार कार्यालयात उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व, पेन्शन, सातबारा उतारा, नॉन क्रिमिलेअर, जनसंख्या प्रमाणपत्र, मरण उतारा, जन्म दाखला आदी कागदपत्रे मिळत असतात. यासाठी कार्यालयाच्या परिसरात नागरिकांची सतत गर्दी असते. याचा फायदा घेत काही खासगी व्यावसायिक बनावट कागदपत्रे बनवून सामान्य जनतेला फसवत आहेत. बोगस कागदपत्रे बनविण्याचा सिलसिला गेल्या कित्येक दिवसांपासून चालू असल्याने वरि÷ अधिकाऱयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.