|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मेक इन कोलकाता, सेल इन चिकोडी

मेक इन कोलकाता, सेल इन चिकोडी 

प्रतिनिधी/   चिकोडी

गत दोन महिन्यांपासून पडलेली थंडी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे आता उन्हाळय़ाची चाहूल लागताच परराज्यातील मातीचे माठ विकणारे विक्रेते नुकतेच चिकोडीत दाखल झाले असून सदर विक्रेत्यांनी आणलेले माठ सर्वांनाच आकर्षित करीत आहेत. चिकोडी शहरातील निपाणी-मुधोळ महामार्गावरील विठ्ठल दामोदर नगराच्या प्रवेशद्वारानजीक पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका विक्रेत्याने गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱया मातीचे माठ विक्रीसाठी आणले आहेत. विक्रीसाठी आणलेले हे माठ पारंपरिक माठाहून विभिन्न व आकर्षक असल्याने सदर माठ खरेदीसाठी चिकोडीकर गर्दी करत आहेत.

सदर माठ कोलकाता येथे तयार करण्यात आले असून माठ लाल मातीबरोबरच पांढऱया रंगाच्या मातीपासूनही बनविण्यात आले आहेत. पारंपरिक माठांचा आकार हा गोलाकर असतो. पण पश्चिम बंगालहून आणलेले हे माठ वेगवेगळय़ा आकर्षक आकाराचे असून पांढऱया माठांची किंमत 450 ते 600 तर लाल मातीपासून बनविलेल्या माठांची किमत 150 रुपये ते 350 रुपयापर्यंत आहे. हे माठ ठेवण्यासाठी सदर विक्रेत्याने स्टॅण्ड देखील आणले आहेत. गत दोन दिवसांपासून चिकोडीकरांनी हे विविध आकाराचे, रंगाचे माठ खरेदी करत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोलकाता येथे तयार केलेले हे माठ चिकोडीत विकण्यात येत असल्याने मेक इन कोलकाता, सेल इन चिकोडी अशी खमंग चर्चा चिकोडीकरांतून होत आहे.

विविध ठिकाणी विक्री

कोलकाताहून आलेल्या मिथुनदास या विक्रेत्याने तरुण भारतशी बोलताना सांगितले की, हे माठ आपण विविध कारागिरांकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी करतो व हे माठ कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ आदी राज्यातील मोठमोठय़ा शहरात विकतो. विविध ठिकाणी रस्त्याकडेला रिकाम्या जागेत झोपडी मारुन याठिकाणी विक्री करतो. उन्हाळा संपेपर्यंत आपण हाच व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतो. खरेदी व इतर खर्च जाता प्रति महिना 25 ते 30 हजार रुपये कमाई होते, असे त्यांनी सांगितले.

चिकोडीत उन्हाळय़ाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक माठ उत्पादक व विप्रेते माठ विक्रीसाठी ठेवण्याअगोदरच कोलकात्याच्या मिथुनदास याने गत दोन-तीन दिवसांपासून माठाची विक्री चालविली आहे. शहरातील तापमानाचा आकडा जसजसा वाढत जाईल तसतसे माठांच्या खरेदीस वेग येईल. या आशेने मिथुनदास याने आपले विक्रीरुपी कार्य वाढविण्यावर जोर देणार असल्याचेही सांगितले. एकंदरीत यावर्षी गरिबांचा फ्रिज वेगळय़ा छटेत मिळणार आहे.