|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचे आठव्या दिवशी उपोषण सुरूच

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचे आठव्या दिवशी उपोषण सुरूच 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर शिक्षकभरती व्हावी यासाठी अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. यातील काही उमेदवारांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचार करुन ही मुले पुन्हा उपोषणाला बसली आहेत.

डॉक्टरांनी या मुलांची तब्येत खालावल्याने फळे आणि ज्यूस पिण्याचा सल्ला दिला आहे. असे न केल्यास या मुलांची प्रकृती आणखी खालवू शकते, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतः फोन करून या मुलांशी संवाद साधला. मात्र विनोद तावडे यांच्या फोन नंतरही या उपोषणावर तोडगा निघू शकलेला नाही. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा या मुलांनी घेतला आहे. 24 हजार जागांची शिक्षक भरतीची जाहिरात एकाच टप्प्यात काढल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर हे उमेदवार ठाम आहेत. महाराष्ट्रभरातून इतर उमेदवारही येऊन या उपोषण करणाऱया उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मंगळवारी मुंबईला येऊन चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली आहे. आंदोलनकर्त्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.