|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » राफेल प्रकरण : कॅगचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द

राफेल प्रकरण : कॅगचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजणाऱया राफेल डीलबद्दलचा अहवाल कॅगने राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. त्यामुळे कॅगचा अहवाल संसदेत कधी मांडला जाणार, याची उत्सुकता आहे. कॅगने आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. याबद्दलचे वृत्त इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.

कॅगने अहवालाची एक प्रत राष्ट्रपतींना आणि दुसरी प्रत अर्थ मंत्रालयाला पाठवली आहे. या अहवालात एकूण 12 प्रकरणे आहेत. काही आठवडय़ांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाने राफेलबद्दलचा सविस्तर उत्तर आणि संबंधित अहवाल कॅगला सोपवला होता. यामध्ये खरेदी प्रक्रियेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती होती. याशिवाय 36 राफेल विमानांच्या किमतींचाही समावेश होता. कॅगचा अहवाल अतिशय मोठा असून तो प्रोटोकॉलप्रमाणे सर्वप्रथम राष्ट्रपतींना पाठवण्यात आला. यानंतर आता राष्ट्रपती भवनाकडून हा अहवाल लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पाठवला जाईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या बुधवारी संपणार आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा कॅगचा अहवाल लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला जाऊ शकतो.