|Sunday, October 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ

संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ 

श्रीमद्भागवतात यापुढे आलेला श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत अक्रूराला काय म्हणतात –

भवद्विधा महाभागा निषेव्या अर्हसत्तमाः ।

श्रेयस्कामैर्नृभिर्नित्यं देवाः  स्वार्था न साधवः

श्लोकाचा भावार्थ असा-जे आपले कल्याण इच्छितात, त्यांनी आपल्यासारख्या परम पूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे. संत देवतांपेक्षाही श्रे÷ होत. कारण देवता स्वार्थी असतात, संतांचे ठिकाणी स्वार्थ नसतो.

भगवंताच्या या म्हणण्याची प्रचिती देणारी एक सुंदर कथा श्रीमद्भागवताच्या सहाव्या स्कंधात आली आहे. तिचा भावार्थ असा-महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला सांगतात-राजन, त्रैलोक्मयाचे ऐश्वर्य मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला होता. त्यामुळेच तो अधर्माने वागू लागला होता. एके दिवशी सभेत मरुद्?गण, वसू, रुद्र, आदित्य, ऋभू, विश्वेदेव, साध्य, अश्विनीकुमार, सिद्ध, चारण, गंधर्व, ब्रह्मज्ञानी मुनी, विद्याधर, अप्सरा, किन्नर, पक्षी आणि नाग त्यांची सेवा आणि स्तुती करीत होते. सगळीकडे मधुर स्वराने त्याच्या कीर्तीचे गायन चालू होते. डोक्मयावर चंद्रमंडलाप्रमाणे सुंदर शुभ्र छत्र शोभत होते. चवऱया, पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामग्री तेथे होती. या सभेत अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्राणीसह इंद्र अतिशय शोभून दिसत होता. त्याचे स्वतःचे आणि सर्व देवांचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तेथे आले, तेव्हा सुरासुरांनी नमस्कार केलेल्या त्यांना सभेत आलेले पाहूनही इंद्र उभा राहिला नाही की त्याने त्यांना आसन वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला नाही. एवढेच नव्हे तर तो आपल्या आसनावरून हललासुद्धा नाही. त्रिकालदर्शी समर्थ बृहस्पतींनी पाहिले की, याला ऐश्वर्याचा माज चढला आहे. झाले! ते ताबडतोब तेथून निघून गुपचुप आपल्या घरी आले.

परीक्षिता, त्याचवेळी आपण गुरुंची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले आणि भर सभेत तो स्वतः आपलीच निंदा करू लागला. अरेरे! ऐश्वर्याच्या नशेत चूर होऊन, मी मूर्खाने भरसभेत आपल्या गुरुदेवांचा तिरस्कार केला. खरेच! मी हे किती वाईट केले! कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातीलदेखील राजलक्ष्मीची इच्छा धरील? आज हिनेच तर मला देवराज असूनसुद्धा राक्षस बनवले. जे लोक असे म्हणतात की, सार्वभौ?म राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटाने कोणासाठीही उठू नये, ते धर्माचे खरे स्वरूप जाणत नाहीत. असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत. ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात. शिवाय जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात, तेही दगडाच्या नावेत बसलेल्याप्रमाणे बुडून जातात. माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत. मी फारच उद्धटपणा केला आहे. आता मी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करीन.

इंद्र असा विचार करीत होता, तेवढय़ात बृहस्पती आपल्या घरून निघून योगबलाने अंतर्धान पावले. देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला परंतु त्यांचा ठाव-ठिकाणा समजला नाही. तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत, असे समजून देवांसह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सापडला नाही, तेव्हा तो अस्वस्थ झाला.

Ad.  देवदत्त परुळेकर