|Sunday, October 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हळदीकुंकू

हळदीकुंकू 

सध्याचे ठाऊक नाही, पण पूर्वी फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळांमध्ये स्नेहसंमेलने होत तेव्हा मुलांच्या शाळेत स्त्रीपात्रविरहित एकांकिका आणि मुलींच्या शाळेत पुरुषपात्रविरहित एकांकिका बसवून सादर केल्या जात. मोठेपणी हळदीकुंकू हा असाच पुरुषपात्रविरहित सांस्कृतिक कार्यक्रम परिचित झाला. मकर संक्रांत आली की या कार्यक्रमाची चाहूल लागते. रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचे कार्यक्रम झडत राहतात. एकमेकींना वाण दिले जाते, लुटले जाते.

यंदा एका मित्राने आतल्या खोलीत बसून बाहेरच्या खोलीत चाललेल्या हळदीकुंकवाच्या गप्पा ऐकल्या आणि दुसऱया दिवशी बागेत आल्यावर सर्व मित्रांना त्यांचा सारांश कथन केला. कोणीतरी विदुषी आपल्या मैत्रिणींना वजन कमी करण्याबाबत मार्गदर्शन करीत होती. उपाय अर्थातच एक. दीक्षित आहार योजना. तिने दोघी मैत्रिणींना सारी योजना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली. दिवसातून दोनच वेळा आहार घेऊन मधल्या वेळात लागणारी भूक विसरण्यासाठी टीव्हीवर आवडती मालिका बघायला किंवा व्हॉट्स ऍपवरचे अद्भुत संदेश वाचून ज्ञान ग्रहण करायला सुचवलं. त्यांचं अगदी समुपदेशनच केलं म्हणा नं. त्या दोघी शंका विचारीत होत्या. त्यांचं निरसन केलं. तिच्या समुपदेशनातलं एक वाक्मय ह्रदयस्पर्शी होतं. ते असं.

“अहो माझं वजन परवा परवापर्यंत शंभर किलो होतं. आता ते ऐंशी किलोपर्यंत खाली आलंय.’’

“अय्या, खरं नाही वाटत हो.’’ “तुमची दोघींची वजनं तर ऐंशी-ब्याऐंशी किलो दिसताहेत. तुम्ही माझं ऐका. येत्या तीन महिन्यात तुमची वजनं पंच्याहत्तर किलो होतील आणि वर्षभरात सत्तर किलोहून कमी होऊन तुम्ही छान सडपातळ दिसाल.’’

ऐंशी किलोच्या सवाष्णी अगदी हरखून गेल्या. त्यांनी निघताना सल्लागार सवाष्णीचे मनापासून आभार मानले, तिचा मोबाईल नंबर मागून घेतला आणि मग गेल्या. त्या गेल्यावर सल्लागार मनापासून हसली. मित्राच्या बायकोने तिला विचारलं,

“का हो हसलात?’’ “माझं वजन शंभर किलोवरून ऐंशी किलो झालं ही मी थाप मारली होती हो. गेली कित्येक वर्षे माझं वजन ऐंशी किलोच आहे. पण मला हे आहार-नियंत्रण किंवा व्यायाम अजिबात जमणार नाही. आणि मला वजन कमी करण्याची इच्छा देखील नाही.’’ “मग त्यांना एवढं जीव तोडून का मार्गदर्शन केलं?’’

“त्या सडपातळ झाल्या तर त्यांचे सगळे विद्यमान डेस मला पळवता येतील.’’