|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय शेअरबाजारांवर विक्रीचा दबाव

भारतीय शेअरबाजारांवर विक्रीचा दबाव 

नफाकमाईमुळे सेन्सेक्स 36,500 च्या खाली

वृत्तसंस्था/ मुंबई

जगातील इतर शेअरबाजार प्रगतीपथावर असताना भारतीय शेअरबाजार मात्र विक्रीच्या दबावाखाली असल्याचे दिसत आहे. शेअरबाजारांवरही आता लोकसभा निवडणुकीचा प्रभाव जाणवू लागला आहे. परिणामी, गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसतात. वाहननिर्मिती कंपन्यांचे तिमाही ताळेबंद फारसे समाधानकारक नाहीत. त्यामुळे या कंपन्यांच्या समभागांना गेल्या दोन तीन सत्रांमध्ये फटका बसला आहे. सोमवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 151.45 अंकांनी घसरून 36,395.03 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी दिवअखेर 49.80 अंकांनी घसरून 10,888.80 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांचीही घसरण दिसून आली.

सोमवारच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या समभागांना सर्वाधिक फटका बसला. त्यांचा भाव साधारणतः 5 टक्क्यांनी कमी झाला. दिवसभरात एकावेळी तो 14 टक्क्यांनी कमी झाला होता. प्रवासी वाहनांची विक्री सलग तिसऱया महिन्यात मंदावली आहे. सणासुदीच्या काळातही वाहनांना फारसा उठाव नव्हता. ही स्थिती कदाचित पुढच्या तिमाहीत सुधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ओएनजीसी, बजाज फायनान्स, रिलायन्स, स्टेट बँक, हीरो मोटर, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, वेदांता, येस बँक आणि ऍक्सिस बँक या कंपन्यांचे समभागही सरासरी 2.54 टक्क्यांनी घसरले. अमेरिकेच्या औषध विभागाने डॉ. रेड्डीज लॅबच्या कार्यालयाची तपासणी केल्याने या कंपनीचे समभागही 6 टक्क्यांनी घसरले.

तथापि, टाटा स्टील समभागांच्या दरात मात्र सुधारणा झाली. याशिवाय, पॉवरग्रिड, हिंदुस्थान युनिलीव्हर, टेक, कोटक बँक आणि मारूती यांचेही समभाग वधारले. ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू, वाहननिर्मिती, पायाभूत सुविधा, एफएमसीजी इत्यादी क्षेत्रांना फटका बसला आहे.

सोमवारच्या व्यवहारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 960.04 कोटी रूपयांचे समभाग विकले. तर विदेशी गुंतवणूकदारांनी 843.73 कोटी रूपयांच्या समभागांची खरेदी केली. आशियायी देशांमधील शेअरबाजारांची मात्र सोमवारी प्रगती झाली. शांघाय काँपोझिट 1.36 टक्क्यांनी वधारला. तर हॅगसेंग अर्धा टक्का वधारला.

आगामी काही दिवस शेअरबाजारांमध्ये चढउतारांचे वातावरण असेल. गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात खरेदी न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधपणा महत्वाचा आहे, असा इशारा शेअरबाजार तज्ञांनी दिला आहे.