|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘देव तेथेचि जाणावा!’

‘देव तेथेचि जाणावा!’ 

प्रशांत वाडेकर / देवगड:

कुत्र्याने चपाती पळविल्यानंतर, त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून त्याच्यामागून तुपाची वाटी घेऊन धावणारे संत़श्रेष्ठ नामदेव महाराज आपणा सर्वांना माहीत आहेत. संतांची थोरवी ही वेगळीच. त्याला कशाचीही तोड नाही. पण आता माणुसकी हरवत चाललेल्या जगात अशीही काही माणसे आढळतात की त्यांच्या वागण्याने नकळत तोंडी येते, ‘देव तेथेचि जाणावा!’

कुणकेश्वर येथे सोमवारी अशीच एक घटना घडली. मंदिरानजीक कचरा कुंडीच्या बाजूला ‘लूत’ लागून आजारी असलेला, प्रचंड वेदनेने विव्हळणार एक कुत्रा इकडून तिकडे धावत होता. त्याच दरम्यान कुणकेश्वर पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटक दाम्पत्याच्या दृष्टीस तो कुत्रा पडला. त्याला त्या अवस्थेत पाहताच त्या परदेशी पर्यटक महिलेला राहवले नाही. त्या जखमी कुत्र्याला जवळ घेत तिने त्याच्यावर मायेचा हात फिरवला. त्याला उचलून घेत स्वच्छ केलं. तसेच पतीकडून त्याचा टी-शर्ट घेत त्या कुत्र्याला पकडून उचलून घेतले. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याबाबत चौकशी करून त्याला तात्काळ पशु वैद्यकीय अधिकाऱयाकडे नेले. हे परदेशी जोडपे एवढय़ावरच न थांबता त्या कुत्र्याला पनवेल येथील ऍनिमल शेल्टरमध्ये नेण्यासाठी सोबत घेत मुंबईच्या दिशेने प्रस्थानही केले.

अमेरिकेतील सायमन जोन्स हेझ आणि त्याची पत्नी नोरा हेझ हे कुणकेश्वर येथे पर्यटक म्हणून आले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मंदिरानजीक असलेल्या कचराकुंडीजवळ हा कुत्रा त्यांच्या नजरेस पडला. नोरा हेझ ही अमेरिकेतील प्राणीमित्र आहे. या कुत्र्याला त्यांनी जेव्हा देवगड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांच्याकडे आणले, तेव्हा तेही काही काळ स्तंभित झाले. त्यांनी तात्काळ त्या कुत्र्यावर उपचार सुरू केले. जखमांवर मलमपट्टी केली. उपचार झाल्यानंतर त्या जोडप्याने डॉ. घोगरे यांना सांगितले की या कुत्र्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याला आम्ही पनवेल येथील ऍनिमल शेल्टरमध्ये घेऊन जातो. तेव्हा डॉ. घोगरे यांनी कुत्र्याच्या सुरक्षिततेसाठी एक बास्केटही त्यांना दिले.

हे परदेशी दाम्पत्य कुणकेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. ते पर्यटन स्थळे फिरून मजा, मस्ती करून मायदेशी जाऊ शकले असते. मात्र, जखमी कुत्र्याला पाहताच त्यांनी देश, प्रांत पाहिला नाही. त्यांच्यातील माणुसकी जागी झाली अन् त्या कुत्र्याला जणू जीवदानच मिळाले. एरव्ही कदाचित हेटाळणीचा विषय ठरू शकणाऱया या कुत्र्याला ‘माणुसकी अनुभवता आली’. या अमेरिकन दाम्पत्याने त्यांच्या एका सहज कृतीतून एक आदर्श दाखवून दिला, त्याला निश्चितच तोड नाही.