|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अंतराळवीरांना वायुदलाचे प्रशिक्षण

अंतराळवीरांना वायुदलाचे प्रशिक्षण 

गगनयान मोहीम : इस्रोने सोपविली जबाबदारी : इन्स्टीटय़ूट ऑफ एअरोस्पेस मेडिसीनमध्ये प्रशिक्षण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम ‘गगनयान’च्या 10 सदस्यांची निवड आणि प्रशिक्षणाची जबाबदारी वायुदलाला सोपविली आहे. अंतराळवीरांची निवड तसेच प्रशिक्षणाशी संबंधित सर्व मापदंड तसेच पात्रता निश्चित करण्यात आली असून ही जबाबदारी भारतीय वायुदलाला सोपविण्यात आल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले
आहे.

 प्रशिक्षणाचे पहिले 2 टप्पे वायुदलाच्या इन्स्टीटय़ूट ऑफ एअरोस्पेस मेडिसीन (बेंगळूर) मध्ये पार पडतील आणि त्यानंतर अंतिम टप्प्याचे प्रशिक्षण विदेशात होणार असल्याचे सिवान यांनी म्हटले आहे. गगनयान मोहिमेसाठी 10 उमेदवारांना वायुदलाने प्रशिक्षण द्यावे, असे आम्ही इच्छितो. यातील 3 जणांची आमच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी निवड केली जाणार आहे. अंतराळवीरांच्या विदेशातील प्रशिक्षणाबद्दल फ्रान्स, रशिया तसेच अन्य काही देशांची नावे विचाराधीन असली तरीही यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती त्यांनी दिली.

इन्स्टीटय़ूट ऑफ एअरोस्पेस

आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसशी संबंधित इन्स्टीटय़ूट ऑफ एअरोस्पेस मेडिसीन (आयएएम) ही एअरोस्पेस मेडिसीनच्या क्षेत्रात संशोधन करणारी भारत तसेच दक्षिण-पूर्व आशियातील एकमात्र संस्था आहे. पूर्वी या संस्थेचे नाव ‘एव्हिएशन मेडिसीन’ असे होते. 1980 च्या दशकात भारत-सोव्हिएत संघाच्या अंतराळ कार्यक्रमांना याच संस्थेने वैद्यकीय सहाय्य पुरविले होते. आयएएममधील सुविधा आधुनिक असल्याने गगनयान मोहिमेसाठी तेथेच प्रशिक्षण देणे योग्य ठरणार असल्याचे इस्रोचे मत
आहे.

गगनयान मोहीम

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी लालकिल्ल्यावरील संबोधनात भारत गगनयानच्या माध्यमातून 2022 पर्यंत अंतराळात मनुष्य पाठविण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अशी कामगिरी साध्य करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. गगनयान पथकाने डिसेंबर 2020 मध्ये मानवरहित मोहिमेची योजना आखली आहे. तर अंतराळात डिसेंबर 2021 पर्यंत भारताचा अंतराळवीर पाठविला जाणार आहे. 3 अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत 7 दिवसांच्या कालावधीसाठी पाठविण्याची इस्रोची योजना आहे. या मोहिमेकरता 10 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.