|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » किलोभर तांदळासाठी व्हेनेझुएलात हत्यासत्र

किलोभर तांदळासाठी व्हेनेझुएलात हत्यासत्र 

आर्थिक अन् राजकीय संकट चिघळले : 1 किलो बटाटय़ाची किंमत पोहोचली 17 हजार रुपयांवर

वृत्तसंस्था/  कराकस

व्हेनेझुएलातील आर्थिक संकटामुळे तेथील लोकांची उपासमार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनुसार उपासमारीमुळे एक किलो तांदळासाठी लोक एकमेकांची हत्या करण्याचे पाऊल उचलत आहेत. स्थिती हाताबाहेर जाऊन देखील व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी आपला देश भिकारी नसल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय मदत घेण्यास नकार दिला आहे. व्हेनेझुएलातील महागाईचा दर 13 लाख टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

व्हेनेझुएलाच्या बाजारात एक किलो चिकनची किंमत 10,277 रुपये, रेस्टॉरंटमधील साधे भोजन 34 हजार रुपये, 5 हजार रुपयांना एक लिटर दूध, 6536 रुपयांमध्ये एक डझन अंडी, 11 रुपयांमध्ये एक किलो टॉमेटो, एक किलो बटाटे 17 हजार रुपयांमध्ये आणि कोका कोला या शीतपेयाची दोन लिटरची बाटली 6 हजार रुपयांमध्ये खरेदी करावी लागत आहे.

आंतरराष्ट्रीय मदत नाकारली

अमेरिकेतून मदतसामग्री घेऊन येणाऱया जहाजाला व्हेनेझुएलाच्या सरकारने रोखले आहे. हे जहाज कोलंबियाच्या कुकुटा येथे थांबले आहे. मादुरो सरकारने आंतरराष्ट्रीय मदत रोखण्यासाठी कोलंबिया-व्हेनेझुएला सीमेवरील पूल बंद केला आहे. मदतीच्या माध्यमातून अमेरिका आमच्या देशात हस्तक्षेप करू पाहत असल्याचा आरोप मादुरो यांनी केला आहे.

आर्थिक अन् राजकीय संकट

व्हेनेझुएला सध्या केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय संकटाला सामोरा जातोय. तेथे मादुरो यांच्यासह विरोधी पक्षनेते जुआन गुएडो यांनी स्वतःला अध्यक्ष घोषित केले आहे. पाश्चिमात्य देशांनी गुएडो यांना समर्थन दिले आहे. तर मादुरो यांना केवळ चीन आणि रशियाचा पाठिंबा प्राप्त झाला आहे. मादुरो यांची राजकीय स्थिती आता अत्यंत खराब झाली असून त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून जाऊ लागले आहेत.

अमेरिकेचे आवाहन

मादुरो सरकारचे आरोप फेटाळत अमेरिकेने व्हेनेझुएलाला पूल खुला करण्याचे आवाहन केले आहे. मादुरो सरकारने उपाशी लोकांपर्यंत मदत पोहोचू द्यावी. व्हेनेझुएलातील सद्यस्थिती अत्यंत गंभीर असून तेथे उपाशी, आजारी लोकांना तत्काळ मदतीची गरज असल्याचे अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनी ट्विट करत म्हटले आहे. याचदरम्यान अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक मसुदा प्रस्ताव सादर करण्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावात व्हेनेझुएलात आंतरराष्ट्रीय मदत पोहोचविण्यासाठी सर्व देशांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.