|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रज्नेश गुणेश्वरन प्रथमच पहिल्या शंभरमध्ये

प्रज्नेश गुणेश्वरन प्रथमच पहिल्या शंभरमध्ये 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अलीकडे उत्तम सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारणारा प्रज्नेश गुणेश्वरन कारकिर्दीत प्रथमच पुरुष एकेरीतील पहिल्या 100 मध्ये दाखल झाला. ताज्या मानांकन यादीत त्याचे स्थान 6 अंकांनी सुधारले असून सध्या तो 97 व्या स्थानी विराजमान झाला आहे. मागील दशकभराच्या कालावधीत पहिल्या शंभरमध्ये दाखल होणारा तो केवळ तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला. यापूर्वी सोमदेव देववर्मन व युकी भांबरी यांनी असा पराक्रम गाजवला आहे.

डावखुरा प्रज्नेश गुणेश्वरनसाठी 2018 चा हंगाम बराच फलदायी ठरला. गत आठवडय़ात तो एटीपी चेन्नई चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही पोहोचला. प्रज्नेशने पहिल्या शंभरमधील स्थान कायम राखले तर ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये त्याला आवर्जून संधी मिळेल. यापूर्वी युकीने अशी कामगिरी केली. पण, नंतर सातत्याने दुखापतीचा फटका बसल्याने त्याची संधी हुकली. प्रत्येक वेळी पहिल्या शंभरमध्ये पोहोचल्यानंतर त्याला दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ बाहेर जावे लागले. सध्या युकी 156 व्या स्थानी असून रामकुमार रामनाथन 128 व्या स्थानी आहे. साकेत मायनेनी 255 व्या तर सासी कुमार मुकुंद कारकिर्दीतील सर्वोत्तम 271 व्या स्थानी पोहोचला आहे. मुकुंद चेन्नई चॅलेंजर स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचला होता.

दुहेरीत रोहन बोपण्णा 37 व्या स्थानी असून त्याचा सहकारी दिवीज शरण 39 व्या, लियांडर पेस 75, जीवन नेदूचेझियान 77 तर पूरव राजा 100 व्या स्थानी आहेत. डब्ल्यूटीए क्रमवारीत अंकिता राणा देशातील अव्वल एकेरी खेळाडू असून करमन कौर थांडीची 211 व्या स्थानी घसरण झाली आहे.