|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » दिल्ली निवड समिती अध्यक्षांवर हल्ला

दिल्ली निवड समिती अध्यक्षांवर हल्ला 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

माजी भारतीय क्रिकेटपटू व दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना निवड समिती अध्यक्ष अमित भंडारी यांच्यावर सोमवारी काश्मिरी गेट आवारात हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. येथील सेंट स्टीफन मैदानावर 23 वर्षाखालील संघनिवडीसाठी चाचणी सुरु असताना त्यांच्यावर हल्ला केला गेला. वगळल्या गेलेल्या एका खेळाडूंच्या समर्थकांनी त्यांच्यावर हा हल्ला केल्याचा अंदाज आहे.

भंडारी यांच्यावर चक्क लोखंडी रॉड व हॉकी स्टीकने हल्ला केला गेला. यात त्यांना डोक्याला व पायाला बरीच दुखापत झाली आणि त्यांना तातडीने संत परमानंद इस्पितळात दाखल करण्यात आले. नवी दिल्लीत क्रिकेट अकादमीही चालवणारे भंडारी यांना सात टाके पडले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. दोषींविरुद्ध लवकरच तक्रार दाखल केली जाणार असून त्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी दिल्ली संघटना जोरदार प्रयत्न करेल, असे संकेत यावेळी दिले गेले.