|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपसाठी पंत, रहाणेसह विजय शंकरचाही विचार होईल

वर्ल्डकपसाठी पंत, रहाणेसह विजय शंकरचाही विचार होईल 

निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे व विजय शंकर या तिन्ही खेळाडूंकडे आम्ही आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी अपेक्षेने पहात आहोत. या तिघांचाही प्राधान्याने विचार होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले. यंदाच्या वनडे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ काही मोजके सामने खेळणार असून संघाची जडणघडण निर्णायक टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एमएसके प्रसाद यांनी सदर वक्तव्य केले.

भारतीय क्रिकेट संघ सध्या उत्तम बहरात असून विदेशात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या पाचपैकी तीन मालिका त्यांनी जिंकल्या आहेत. संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी व वनडे मालिका जिंकली तर टी-20 मालिका बरोबरीत राखली. विराटने न्यूझीलंडमध्ये संघाला 10 वर्षांनंतर प्रथमच वनडे मालिकाविजय मिळवून दिला. पण, त्याच्या गैरहजेरीत संघाला टी-20 मालिका 1-2 अशा फरकाने गमवावी लागली.

या सर्व वाटचालीदरम्यान, अनेक सकारात्मक बाबी अधोरेखित झाल्या. धोनी, अम्बाती रायुडू व केदार जाधव यांचे सातत्य लक्षवेधी ठरले तर दिनेश कार्तिकनेही कसलेल्या खेळाडूप्रमाणे खेळ साकारला. पण, धोनी यष्टीरक्षण करत असल्याने वर्ल्डकपमध्ये फलंदाज या नात्याने त्याला संधी मिळण्याचे संकेत आहेत. हार्दिक पंडय़ाने जोरदार पुनरागमन करत आपली दावेदारी आणखी भक्कम केली तर विजय शंकरनेही न्यूझीलंडविरुद्ध विशेष प्रभावशाली खेळ साकारला आहे. न्यूझीलंडविरुद्ध संपन्न झालेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघातर्फे सर्वोच्च धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मापाठोपाठ विजय शंकरच दुसऱया स्थानी राहिला. 

शेवटच्या दोन टी-20 सामन्यात पंतने अनुक्रमे 40 व 28 धावांची जलद खेळी साकारली. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात त्याच्या खात्यावर काही शतकेही आहेत. ऋषभ पंतने मागील वर्षभरात आपल्या खेळात बरीच प्रगल्भता आणली असून याचमुळे त्याला संघव्यवस्थापनाने अधिक अनुभव मिळावा, यासाठी प्रथमश्रेणी स्तरावरही शक्य तितके खेळवले आहे. अजिंक्य रहाणे विश्वचषकासाठी स्पर्धेत असला तरी पर्यायी सलामीवीर या नात्याने त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केएल राहुल खराब फॉर्ममधून जात असून रहाणे मात्र प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धांसह भारत अ संघातर्फे इंग्लंड लायन्सविरुद्ध देखील उत्तम खेळला आहे. त्यामुळे, तो चर्चेत आहे. विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघात या खेळाडूत प्रामुख्याने चुरस असेल, हे निश्चित असून दि. 23 एप्रिल ही संघनिवड जाहीर करण्याची डेडलाईन आहे.