|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » कमिन्स, हीली यांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

कमिन्स, हीली यांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार 

वृत्तसंस्था/ मेलबर्न

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक सन्मान  मिळाला असून वर्षभरातील कामगिरीच्या आधारावर त्याला हा बहुमान देण्यात आला आहे. त्याला ऍलन बॉर्डर पदकाने सन्मानित करण्यात आले. महिलांमध्ये ऍलीसा हीलीला बेलिंडा क्लार्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सोमवारी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. कमिन्सला एकूण 156 मते मिळाली तर ऑफस्पिनर नाथन लियॉनला 150 मते मिळाली. लियॉनला वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार देण्यात आला. कमिन्सने बारा महिन्याच्या कालावधीत क्रिकेटच्या तीनही प्रकारात मिळून 25.61 च्या सरासरीने 44 बळी मिळविले. अलीकडेच ऑस्ट्रेलियाने लंकेवर कसोटी मालिकाविजय मिळविला. त्यात कमिन्सने मालिकावीर पुरस्कार मिळविला होता. पण या कामगिरीचा त्यात विचार करण्यात आला नव्हता. 25 वर्षीय कमिन्सने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत 7 बळी मिळविले. पण पाठदुखीमुळे त्यानंतर 2017 पर्यंत त्याला दुसरी कसोटी खेळायला मिळाली नव्हती. आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या मानांकनातही तो आता दुसऱया स्थानावर आहे. 2017 मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेनंतर मात्र तो संघाचा नियमित सदस्य बनला आहे. त्याने आतापर्यंत 20 कसोटीत 94 बळी मिळविले आहेत.

महिलांमध्ये हीलीने वनडे व टी-20 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्यात ती स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली होती.