|Monday, December 9, 2019
You are here: Home » क्रिडा » विंडीजचा 154 धावांत फडशा

विंडीजचा 154 धावांत फडशा 

वूडचे 5, मोईनचे 4 बळी, इंग्लंड एकूण 142 धावांनी आघाडीवर

वृत्तसंस्था/ ग्रॉस आयलेट, सेंट लुसिया

मार्क वूडने पहिल्यांदाच मिळविलेल्या पाच बळींच्या बळावर इंग्लंडने विंडीजविरुद्धच्या तिसऱया कसोटीवर पकड मिळविली असून इंग्लंडने दुसऱया दिवशीअखेर विंडीजवर एकूण 142 धावांची आघाडी घेतली आहे.

इंग्लंडचा पहिला डाव 277 धावांत आटोपल्यानंतर मार्क वूडच्या भेदक माऱयापुढे विंडीजचा पहिला डाव 154 धावांत आटोपल्याने इंग्लंडला 123 धावांची आघाडी मिळाली. वूडने 41 धावांत 5 बळी टिपले. त्यानंतर दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 19 धावा जमवित ही आघाडी 142 धावांपर्यंत वाढविली होती. या सामन्याच्या दुसऱया दिवशी एकूण 16 गडी बाद झाले. या मालिकेत संघात प्रथमच स्थान मिळालेल्या वूडने वेगवान माऱयावर इंग्लंडला वरचष्मा मिळवून दिला. त्याने शाय होप (1) व रॉस्टन चेस (0) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्याला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नसली तरी नंतर त्याने शिमरॉन हेतमेयरला (8) स्लिपमध्ये झेलबाद केले. वूडप्रमाणे स्पिनर मोईन अलीलाही हॅट्ट्रिकची संधी मिळाली होती. त्याने सलामीवीर क्रेग ब्रॅथवेटला 12 धावांवर झेलबाद केल्यानंतर पुढच्या चेंडूवर जॉन कॅम्पबेलला (41) पायचीत केले. यातील कॅम्पबेलची विकेट जास्त मोलाची होती. कारण तो मोठी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करीत होता. बेथवेटसमवेत त्याने 57 धावांची सलामी दिली. त्यात त्याचाच वाटा अधिक होता.

चहापानानंतरही वूडने भेदकता पुढे चालू ठेवताना डॅरेन ब्रॅव्होला स्लिपमध्ये झेलबाद केले आणि शॅनन गॅब्रियलला 4 धावांवर बाद करून विंडीजचा पहिला डाव 154 धावांत संपुष्टात आणला. मोईन अलीने 36 धावांत 4 तर स्टुअर्ट ब्रॉडने एक बळी मिळविला. त्याने लाँगऑफवर एकहाती अप्रतिम झेलही टिपला. पहिल्या दोन कसोटी जिंकून विंडीजने ही मालिका याआधीच जिंकली आहे. पण इंग्लंडला शेवटची कसोटी जिंकून पत राखण्याची संधी या सामन्यात मिळाली आहे.  विंडीजकडे वेगवान गोलंदाजांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र त्यांची फलंदाजी अजूनही ठिसूळ असल्याचेच सिद्ध झाले आहे.

इंग्लंडने 4 बाद 231 या धावसंख्येवरून दुसऱया दिवसाची सुरुवात केली होती. पण त्यांचे शेवटचे फलंदाज लवकर बाद झाल्याने त्यांचा डाव 277 धावांवर आटोपला. केमार रॉकने 4 बळी टिपले. विंडीज संघातील सर्वात वेगवान गोलंदाज गॅब्रियलने बटलरला (67) बाद करून स्टोक्ससमवेतची त्याची 125 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. आठ षटकानंतर स्टोक्सही 79 धावा काढून बाद झाला. मोईन 13 व बेअरस्टो 2 हेही स्वस्तात बाद झाल्यानंतर विंडीजने त्यांचे शेपूट झटपट गुंडाळले. रॉकने 48 धावांत 4, गॅब्रियल, अल्झारी जोसेफ, कीमो पॉल यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 101.5 षटकांत सर्व बाद 277 : बर्न्स 29 (1 चौकार), जेनिंग्स 8 (1 चौकार), डेन्ली 20 (50 चेंडूत 2 चौकार), रूट 15 (54 चेंडूत 2 चौकार), बटलर 67 (127 चेंडूत 9 चौकार), स्टोक्स 79 (175 चेंडूत 8 चौकार), बेअरस्टो 2, मोईन अली 13, वूड 6, ब्रॉड नाबाद 0, अँडरसन 0, अवांतर 38. गोलंदाजी : रॉक 4-48, गॅब्रियल 2-49, जोसेफ 2-61, कीमो पॉल 2-58, चेस 0-40, ब्रेथवेट 0-5.

विंडीज प.डाव 47.2 षटकांत सर्व बाद 154 : ब्रेथवेट 12, कॅम्पबेल 41 (63 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), होप 1, ब्रॅव्हो 6, चेस 0, हेतमेयर 8, डॉवरिच 38 (56 चेंडूत 6 चौकार), पॉल 9, रॉक नाबाद 16 (43 चेंडूत 1 चौकार), अवांतर 17. गोलंदाजी : वूड 5-41, मोईन 4-36, ब्रॉड 1-42.

इंग्लंड दु.डाव 10 षटकांत बिनबाद 19 (बर्न्स खेळत आहे 10, जेनिंग्स खेळत आहे 8).

Related posts: