|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपनंतर मॅकमिलन प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार

वर्ल्डकपनंतर मॅकमिलन प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार 

वेलिंग्टन / वृत्तसंस्था

यंदा इंग्लंड व वेल्समध्ये होणाऱया आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर आपण न्यूझीलंड संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा क्रेग मॅकमिलनने केली. मॅकमिलन मागील 5 वर्षांपासून फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून या कालावधीत 2015 विश्वचषकात न्यूझीलंडने फायनलपर्यंत मजल मारली होती. ब्रेन्डॉन मेकॉलम, केन विल्यम्सन व रॉस टेलर यांच्यासारख्या कसलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करणे आपल्यासाठी सन्मानाचे होते, असे मॅकमिलन याप्रसंगी म्हणाला. माजी मुख्य प्रशिक्षक माईक हेस्सन यांनी मॅकमिलनला फलंदाजी प्रशिक्षकपदी संधी दिली होती. नंतर या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गॅरी स्टीड गतवर्षी रुजू झाले.

क्रेग मॅकमिलनने न्यूझीलंड संघातर्फे 55 कसोटी व 197 वनडे सामने खेळले आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर फलंदाजी प्रशिक्षक या नात्याने निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षणातच आणखी संधी मिळत असेल तर त्याला आपले प्राधान्य असेल, असे मॅकमिलन म्हणाला. पण, अशी नेमकी कोणती संधी याचा त्याने उल्लेख केला नाही. यंदाची आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा दि. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत होत असून मॅकमिलन यांची प्रशिक्षकपदाची जागा कोण घेईल, हे ऑगस्टपूर्वी स्पष्ट होईल, असे संकेत आहेत. ऑगस्टमध्ये न्यूझीलंड संघ लंका दौऱयावर जाणार आहे.

Related posts: