|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मानधन नको…वेतन द्या…!

मानधन नको…वेतन द्या…! 

अंगणवाडी सेविका, मतदनीसांचे जेलभरो

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मानधन नको…वेतन द्या…! या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांनी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. यानंतर पोलिसांनी आंदोलन कर्त्या महिलांना ताब्यात घेऊन सोडून दिले. या आंदोलनामध्ये †िजल्हयातील विविध गावातील सुमारे 1 हजारपेक्षा अधिक  अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी सहभाग नोंदविला होता.

अंगणवाडीच्या शिष्टमंडळाबरोबर उद्या मंगळवार (दि.12) रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका,मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी युनियनतर्फे देण्यात आला आहे. यानंतर मुंबईत अंगणवाडी सेविका, मतदनीस पुन्हा जेलभरो आंदोलन करणार आहेत. यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे कॉ.आप्पा पाटील, सरिता कंदले, सुलोचना मंडपे, दिलीप उटाणे, शुभा शमीम, भगवान देशमुख, कमल परुळेकर, एम.ए.पाटील, जयश्री पाटील, सुवर्णा तळेकर, युनियनचे पदाधिकारी आदींसह जिल्हयातील सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे, मध्यवर्ती सरकारच्या मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, केरळ, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, तलंगणा आदी राज्यातील मानधनाप्रमाणे महाराष्ट्रात मानधन मिळावे, सेवा समाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करावी, सेवा समाप्त करण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱयांना लाभाची रक्कम त्वरीत मिळावी, मानधनाच्या अर्धी पेन्शन द्यावी, पेन्शनची अंमलबजावणी करावी, टीएचआर बंद करून लाभार्थी खाण्यास योग्य असा पर्यायी आहार द्यावा, अंब्रेला योजनेतील सुधारीत दर लागू करावी, विमा योजनेची अंमलबजावणी करावी, टीएडीएची रक्कम द्यावी, वाढीव रकमेच्या फरकासह रक्कम द्यावी, आदिवासी व आतिदुर्गम प्रकल्पाच्या कर्मचाऱयांना अतिरिक्त प्रोत्साहनपर मानधानची रक्कम द्यावी, योजनेच्या कामासाठी लागणारे रजिस्टर्स व अहवाल फॉर्म द्यावेत, आजारपणाची एक महिन्याची भरपगारी सुट्टी द्यावी, अपघात काळातील भरपगारी रजा द्यावी, सर्व अंगणवाडी केंद्रांना वजनकाटे, रिक्त जागेवर सेविका, मतदनीस नियुक्ती, अतिरिक्त कामाचे मानधन आदींसह 30 मागण्यांचा समावेश आहे.