|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कव्वाली गायनाने रसिक मंत्रमुग्ध

कव्वाली गायनाने रसिक मंत्रमुग्ध 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

विद्यार्थ्यांनी गायलेल्या कव्वालीचा स्वर आर्त रसिकांच्या हृदयात भिडला. गायक व वादकाची आळवणी करताना लागणारी समाधी श्रोत्यांना आनंद देवून गेली. दर्दी लोकांनी या विद्यार्थ्यांवर जीव ओवाळून टाकला. कव्वालीच्या शब्दातून काही रसिकांना जगाचा विसर पडला.

नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अग्लो उर्दू हायस्कूल यांच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे ‘जल्सा ए दीनियात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कव्वालीचे सादरीकरण केले.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकर, प्रषितांचे महत्व सांगणाऱया कविता, कुराणातील महत्वाच्या वचनांचे वाचन केले. तसेच ‘चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जायेगा…’ यासह अन्य विद्यार्थ्यांच्या कव्वाली गायनाने शाहू स्मारक भवन परिसरातील उपस्थितांची मने जिंकली. पैगंबराची स्तुती करणाऱया कव्वालीचे सादरीकरण केल्यानंतर विद्यार्थी व पालक रसिकांनी वाह, वाह, करीत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला दाद दिली.

महापौर सरीता मोरे म्हणाल्या, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. डॉ. रूबीना महाबरी म्हणाल्या, मुलांनी वडीलधाऱयांचा सन्मान केला पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या अंगी असलेल्या गुणांचे सादरीकरण केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांची जडण-घडण होते. तसेच त्यांच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांचे दर्शन होते. म्हणून विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला पाहिजे.

मुस्लिम बोर्डींगचे प्रशासक कादर मलबारी यांनी प्रास्ताविक केले. सनोबर चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. एस. एस. काझी यांनी आभार मानले. यावेळी मुस्लिम बोर्डींगचे उपाध्यक्ष आदील फरास, चेअरमन लियाकत मुजावर, अल्ताफ झांजी, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, रफिक शेख, जहाँगीर अत्तार, मुसा पटवेगार, मोहसीन खान, मलिक बागवान, मुसा शेख, इम्तियाज बागवान, जुबेर बागवान, एम. एच. मोमीन अब्दुलवाहिद सिद्दीकी यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.