|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चौकशीसाठी मानवाधिकार आयोग लवकरच सोलापुरात

चौकशीसाठी मानवाधिकार आयोग लवकरच सोलापुरात 

अखेर विनायक काळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील उळेगावाजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मरण पावलेल्या विनायक देविदास काळे (वय 30, रा. तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) याच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती घेण्यासाठी आठवडय़ात मानवाधिकार आयोग येणार असल्याची माहिती अदिवासी पारधी विकास परिषदचे जिल्हाध्यक्ष विजय काळे यांनी दिली.

रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास तुळजापूर-सोलापूर रस्त्यावरील उळेगावाजवळील पेट्रोल पंपाजवळ एक विना नंबरची कार थांबली होती. खासगी गाडीतून रात्रगस्त करणाऱया तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय पाटील व कर्मचाऱयांना संशय आला. यामुळे त्यांनी त्या कारमधील तरुणांना हटकले. त्यावर कारमधील तरुणांनी पोलिसांवर उलट हल्ला चढविला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ तरुणावर गोळीबार केला होता. या गोळीबारात विनायक काळे मृत्यूमुखी पडला. त्यानंतर विनायकच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करीत विनायकचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. सोमवारी दिवसभर विनायकचे नातेवाईकांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेऊन विनायकला पोलिसांनी ठार केले असून, त्यांच्यावर सक्त कारवाईची मागणी केली होती. दरम्यान या मागणीसाठी नातेवाईकांनी आत्मदहन करण्याचाही प्रयत्न सोमवारी केला होता. दरम्यान रात्री उशिरा तहसिलदार, नायब तहसिलदार व तज्ञ डॉक्टरांच्या समक्ष विनायकचे शवविच्छेदन करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विनायकच्या नातेवाईकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामध्ये या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतरही नातेवाईकांनी विनायकचा मृतदेह ताब्यात घेतला नाही. यामुळे गोळीबार प्रकरण किचकट बनत  चालले होते.

दरम्यान सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विनायकच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी पुन्हा चर्चा केली. आणि दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विनायकचा मृतदेह ताब्यात घेतला. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा येथे विनायकवर सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोपींच्या तपासासाठी दोन पथके रवाना

या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर इतर आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी कोण आहेत याचा शोध घेत आहोत. आणखी कोणाला त्यावेळी मार लागला आहे, का याचाही तपास केला जात आहे.

पोलीस अधिक्षक

मनोज पाटील

Related posts: