|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कामटेसह सहा जणांवर आरोप निश्चित

कामटेसह सहा जणांवर आरोप निश्चित 

प्रतिनिधी/ सांगली

अनिकेत कोथळे खून प्रकरणी प्रमुख संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सहा जणांवर अखेर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे संशयितांच्या भोवतीचा फास अधिकच घट्ट झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी मंगळवार, 26 फेबुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तीवाद करत कामटेसह सहा जणांच्या विरोधात दहा आरोपांची जंत्रीच न्यायालयासमोर सादर केली होती.

जिह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुरु आहे. सांगली शहर पोलिसांनी सहा नोव्हेंबर 2017 रोजी अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे यांना लुटमारीच्या गुह्यात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी अनिकेतला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदूर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामेटसह बडतर्फ पोलीस हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीत पट्टेवाले, सहा संशयिताविरुद्ध दहा आरोप न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले होते.

यामध्ये कामटेसह सातही संशयितांनी अनिकेतच्या खुनाचा कट रचला. लुटमारीच्या गुह्यात कोथळेसह त्याचा मित्र अमोल भंडारेला अटक केली. चोरीच्या गुह्याशिवाय गुन्हे कबूल करुन घेण्यासाठी अनिकेतचा बेदम मारहाण केली. त्याचा मृत्यू झाल्यानंतर याची माहिती वरिष्ठ अधिकाजयांना कळविणे गरजेचे होते. पण प्रकरण अंगलट घेऊन नये, यासाठी संशयितांनी आंबोलीतील महादेवगड येथे त्याचा मृतदेह जाळला. यामध्ये शिक्षा होऊ शकते, हे माहित असतानाही त्यांना पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हेही कृत्य सर्वांनी संगनमताने केले. अनिकेतचा खून केला असताना तो पळून गेल्याचा बनाव रचला. तशी खोटी फिर्याद देऊन वरिष्ठ अधिकाऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला. अनिकेतचा मित्र अमोल भंडारे यालाही बेदम मारहाण केली. त्याला पिस्तुलाचा धाक दाखविला, या दहा आरोपांचा यामध्ये समावेश होता.

मागील सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तीवाद करत संशयितांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. कामटेसह संशयितांनी कट करुनच अनिकेतचा खून केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. याबाबतचे सबळ पुरावेही असल्याचा युक्तीवाद केला होता. कोथळेचा हेतूपरस्पर खून केला असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने कामटेसह सहा संशयितांच्यावर आरोप निश्चीत केले आहेत. दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी मंगळवार फेबुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील ऍड. उल्हास चिप्रे यांनी दिली.