|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बंगला फोडून लाखाचा ऐवज लंपास

बंगला फोडून लाखाचा ऐवज लंपास 

प्रतिनिधी/ सांगली

शहरातील विजयनगर परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीमधील बंद असलेला बंगला फोडून चोरटय़ांनी एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख सोळा हजार रुपयांसह तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक एलईडी टीव्ही व अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी अकरा ते रविवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत सिध्दांना नागप्पा म्हेत्रे (वय 54 रा. सिद्धिविनायक सोसायटी, श्रीप्रभा बंगला, विजयनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, म्हेत्रे यांचा विजयनगर परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये ‘श्रीप्रभा’ नावाचा बंगला आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता ते कुटुंबीयांसह नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते परत आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी दरवाजाची कडी व कोयंडा मोडून बंगल्यात प्रवेश केला. लाकडी कपाटात असलेले सेफ लॉकरसह, भितींवरील एलईडी टीव्ही लंपास केला आहे. लॉकरमध्ये रोख सोळा हजार तसेच तीन तोळे सोन्याचे दागिने होते.

यामध्ये कानातील झुबे, टॉप्स्, अंगठी, मंगळसूत्र, चांदीचे आरतीचे ताट, वाटी, लक्ष्मी मूर्ती असा अर्धा किलो चांदीच्या ऐवजाचा समावेश आहे. दरम्यान, म्हेत्रे यांनी या घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. याबाबत म्हेत्रे यांनी विश्रामाबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाफर पठाण हे करत आहेत. याबाबत बोलताना पठाण म्हणाले, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. साक्षीदारही तपासण्यात आले आहेत. लवकरच चोरटय़ांना जेरबंद केले जाईल.