|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरी समर्थनार्थ 19 रोजी मेळावा

रिफायनरी समर्थनार्थ 19 रोजी मेळावा 

वार्ताहर/ राजापूर

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध असताना आता प्रकल्प समर्थकही एकवटू लागले आहेत.  याचाच एक भाग म्हणून 19 फेब्रुवारी रोजी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी राजापूर तालुका समन्वय समितीची सभा नुकतीच अध्यक्ष अनिल करंगुटकर यांचे उपस्थितीत पार पडली.          

प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला सुरूवातीपासून जोरदार विरोध होत असून प्रकल्पाविरोधात आजवर अनेक आंदोलने झाली आहेत. आजवर केवळ प्रकल्पविरोधाचीच बाजू सर्वांसमोर येत होती. मात्र हा प्रकल्प व्हावा म्हणून  समर्थकही सक्रीय झाले आहेत. रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला समर्थकांनी लावलेल्या उपस्थितीवरून समर्थकांची ताकद दिसून आली आहे.

त्यानंतर आता रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ 19 फेब्रुवारी रोजी राजापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी राजापूर तालुका समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी मेळावा यशस्वी होऊन प्रकल्पाच्या सकारात्मक बाजू समोर याव्यात यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याच्या सूचना करंगुटकर यांनी दिल्या. तसेच राजापूर तालुक्यातील सर्व प्रकल्पांबाबत विचार विनिमय करून समितीची काम करण्याची पद्धत कशी असावी याबाबत चर्चा झाली.

या सभेसाठी अनिल करंगुटकर, विजय राऊत, प्रकाश दांडेकर, पवन पारकर, मनोज दांडेकर, विक्रांत चव्हाण, दिलीप तांबे शितल पटेल, शितल गोठणकर, रेणुका गुंडये, शितल रहाटे, अनिता पांचाळ व श्रीमती तांबडे उपस्थित होते