|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाशिवरात्रीपूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी

महाशिवरात्रीपूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी 

वार्ताहर/ शिखरशिंगणापूर

शिंगणापूर येथील मुख्य बसस्थानक ते शंभू महादेव मंदिराकडे जाणाऱया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या साईडपट्टय़ा मोठय़ा प्रमाणात खचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मार्चला महाशिवरात्र उसत्व मोठय़ा प्रमाणात साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीपूर्वी बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती करावी आणि संभाव्य होणारे अपघात टाळावेत, अशी भविकांच्यातून मागणी होत आहे.

मंदिराकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे. या रस्त्याने दररोज भाविकांची हजारो वाहने ये-जा करीत असतात. तसेच दररोज 80 ते 90 एसटी बसेसची वाहतूक या मार्गाने होत असते.

अनेक दिवसांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता धोकादायक वळणाचा व तीव्र चढ-उताराचा असून त्यावरील साईडपट्टय़ा एक फुटांपर्यंत खचल्या आहेत. साईडपट्टय़ा खचल्याने मंदिर रस्ता अरुंद बनला असून या रस्त्यावर लहानमोठे अपघात होत आहेत. त्वरित साईडट्टय़ा न भरल्यास याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरवर्षी शिंगणापूर यात्राकाळात मुरूम मातीने साईडपट्टय़ा भरून या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु नंतर काही दिवसांतच रस्त्याची अवस्था जैसे-थे होत असते.

या रस्त्यावरील वळणावर असलेला धोकादायक पूलही खचला असून याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, वळण रस्त्यावर असणारा हा धोकादायक पूलही सध्या अपघातास निमंत्रण देत आहे. पर्यायी रस्त्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. तसेच मुख्य बसस्थानक ते मंदिर बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने डेंजरझोन बनलेल्या शंभू महादेव मंदिर रस्त्याची तातडीने दुरुस्ती अशी मागणी वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांतून होत आहे.